Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २० मार्च, २०२६

एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न


| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक २० : एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी, पुणे-१८ येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक ९ मार्च २०२६ ते १२ मार्च २०२६ दरम्यान दिल्ली, हरिद्वार आणि ऋषिकेश येथे उत्साहात पार पडली. या सहलीत एकूण ४० विद्यार्थ्यांसोबत प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप, प्रा. डॉ. उज्वला भारती आणि अ‍ॅड. अर्पिता गोस्वामी सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी अशा सर्व अंगांचा समावेश असलेली ही सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली.
सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी भारताचे ‘सर्वोच्च न्यायालय’ आणि ‘दिल्ली उच्च न्यायालय’ येथे भेट देऊन प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज पाहिले. न्यायालयातील सुनावणी, वकिलांचे युक्तिवाद आणि न्यायाधीशांची कार्यपद्धती यांचा जवळून अनुभव घेत विद्यार्थ्यांना मौल्यवान कायदेविषयक ज्ञान मिळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘संसद भवन’ येथे भेट देऊन संसद अधिवेशनाची थेट कार्यवाही पाहिली. संसदेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी अनुभव असल्याचे विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याच दिवशी विद्यार्थ्यांची श्री रामदासजी आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री यांच्याशी भेट झाली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून कायदा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘कुतुबमिनार’ या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. त्यानंतर ,राष्ट्रपती भवन’ येथे जाऊन राष्ट्रपती भवनाची भव्य रचना व कार्यपद्धतीची माहिती घेतली. पुढे ‘इंडिया गेट’ येथे भेट देऊन देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले. दिवसाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘करोल बाग’ येथे खरेदीचा आनंद लुटला.
तिसऱ्या दिवशी सर्वजण दिल्लीहून हरिद्वारकडे रवाना झाले. चौथ्या दिवशी ऋषिकेशच्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवत सर्वांनी शांतता आणि सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर ऋषिकेश ते दिल्ली असा परतीचा प्रवास करत सहलीची यशस्वी सांगता करण्यात आली. ही सहल केवळ शैक्षणिक नसून धार्मिक, सांस्कृतिक आणि साहसी अनुभवांनी समृद्ध अशी होती. विद्यार्थ्यांनी या सहलीतून ज्ञानासोबतच आत्मविश्वास, देशभक्ती आणि निसर्गप्रेम यांचीही शिकवण घेतली. या सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले तसेच संचालिका सौ. देवयानी भोसले आणि अ‍ॅड. डॉ. ऋतुजा भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांच्या नेतृत्वामुळे ही सहल यशस्वीपणे पार पडली.
एकूणच, एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिल्ली दौरा आयुष्यभर स्मरणात राहील असा आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा