Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

थेरगावमधील केजुदेवी उद्यान आणि केजुबाई बंधारा विकासाला मंजुरी; ‘वनगंध’ प्रकल्पांतर्गत साकारणार जलक्रीडा पर्यटन केंद्र __(अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती)


नदीचे सौंदर्य वाढणार, नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार

| सांगावा न्यूज | (पिंपरी चिंचवड) थेरगाव, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारा आणि सौंदर्यात भर घालणारा ‘वनगंध’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांच्या भेटीला येत आहे. या प्रकल्पांतर्गत थेरगाव येथील बोट क्लब व केजुदेवी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या नावामध्ये सुधारणा करून तिथे जलक्रीडा पर्यटन विकसित करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच अभिषेक बारणे यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प विकासाची सविस्तर माहिती घेतली. तसेच, संबंधित विभागाला आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना केल्या. या प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सिद्धेश्वर बारणे, 'मे. शिल्पी आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्स'चे वास्तुविशारद पारस एस. नेत्रगावकर हे देखील उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना निसर्ग, पाणी आणि सार्वजनिक जीवनाशी जोडणारा सर्वसमावेशक परिसर या प्रकल्पातून निर्माण केला जात आहे. नदी नागरिकांसाठी खुली करणे आणि वनातून फेरफटका मारण्याचा अनुभव देणारे सार्वजनिक केंद्र निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची रचना मनोरंजन, पर्यावरण आणि संस्कृती यांच्या मिलाफातून करण्यात आली असून, येथे येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य प्रवेशद्वार, आगमन क्षेत्र आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

या प्रकल्पाच्या मुख्य आकर्षणांमध्ये ॲम्फीथिएटर, समुदाय बैठक व्यवस्था, फोटो बूथ, मचान, तसेच बोटिंग जेट्टी, फेरी बोट आणि विविध जलक्रीडांचा (वॉटर स्पोर्ट्स) समावेश आहे. याशिवाय आरोग्य आणि विहारासाठी जॉगिंग ट्रॅक, मुलांचे खेळण्याचे क्षेत्र, निसर्गवाटा (नेचर ट्रेल्स), पुष्पोद्यान, इको पार्क, वॉच टॉवर, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष जागा, विलोभनीय घाट आणि एक मंदिर परिसर उभारला जाणार आहे.

निसर्ग सफर, विपुल हिरवाई आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचा सुंदर मेळ या प्रकल्पात पाहायला मिळणार आहे. हा परिसर केवळ एक पारंपारिक उद्यान न राहता, नदी, निसर्ग आणि समाज यांच्यात निरंतर संवाद साधणारे एक चैतन्यपूर्ण शहरी केंद्र म्हणून आकार घेणार असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

"पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि उत्तम विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. थेरगाव येथील ‘वनगंध’ प्रकल्पामुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढणार नाही, तर याठिकाणी नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा एक नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होईल. हा प्रकल्प नदी, निसर्ग आणि समाज यांना जोडणारा एक आदर्श ठेवा ठरेल". 
__अभिषेक बारणे, सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

‘कमवा व शिका’ योजनेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसोबत कौशल्य विकासाची संधी — प्राचार्य डॉ. पंडित शेळके

विविध विषयांचे आणि कार्यपद्धतींचे व्यावहारिक ज्ञान कमवा शिका योजनेतून विद्यार्थांना आत्मसात 

| सांगावा न्यूज |सांगवी, दिनांक  ४ सप्टेंबर २०२६ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व कमवा व शिका योजनेचे उद्घाटन समारंभ दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ रोजी बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथे करण्यात आले.   

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कामाची प्रतिष्ठा, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आत्मसात करावी, या उद्देशाने ‘कमवा व शिका’ योजनेचे प्रभावीपणे कार्य सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कामाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर दिला जात आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके( सहयोगी अधिष्ठता, भौतिकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ) होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसवरील तसेच संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना समान हक्क आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा या योजनेमागील मूलभूत उद्देश प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सांगितले. तर तसेच ‘कमवा व शिका’ योजनेसोबतच निर्भय कन्या अभियान, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास यांसह ३३ हून अधिक विद्यार्थी विकासाभिमुख उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. आपत्तीच्या प्रसंगी केवळ प्रेक्षक न राहता जखमी व्यक्तीला तातडीने मदत करण्याची सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असेही आवाहन करण्यात आले.

 विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. ‘कमवा व शिका’ योजना ही केवळ शारीरिक श्रम करण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे माध्यम ठरावी, असा संदेश यावेळी डॉ. विजय घाडगे यांच्याद्वारे देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गवत काढणे, बागकाम करणे याबरोबरच प्रशासकीय फायलिंग, प्रोजेक्ट ड्राफ्टिंग, तांत्रिक उपकरणांचा वापर यांसारखी कामे शिकावीत, यावर भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या विभागांत काम करण्याची संधी दिल्यास त्यांना विविध विषयांचे आणि कार्यपद्धतींचे व्यावहारिक ज्ञान मिळेल, असेही सांगण्यात आले.

 तसेच कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालक म्हणून डॉ. रमाकांत कस्पटे हे भूमिका बजावत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना कामातून अनुभव, अनुभवातून ज्ञान आणि ज्ञानातून व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे, असा संदेश यावेळी दिला. सदर उद्घाटन प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारत राठोड, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटनाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास मंडळातील समिती सदस्य प्रा. शीतल शेकडे, प्रा. गणेश कटारिया, प्रा.वैभव बांगले तसेच प्रा. संतोष सास्तुरकर आणि प्रा. महेश खरात, प्रा.प्रविण खाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमाकांत कस्पटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अरबाज सैय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रणीत पावले यांनी केले.

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

भटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा


शिक्षण, उद्योग आणि स्वावलंबनातून समाजाची प्रगती शक्य – सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज

सर्वांगीण विकासासाठी सामाजिक एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. १ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ७५ वा भटके-विमुक्त दिवस रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर, परिसंवाद, ढोल ताशांचा गजर आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या माध्यमातून भटके विमुक्त घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विमुक्त जात समूहाला ब्रिटिश राजवटीत १८७१ सालापासून गुन्हेगार जमात संबोधून तारेच्या कुंपणात बंदिस्त करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने या घटकांना कुंपणाच्या जोखडातून मुक्त केले. या स्वातंत्र्याचा जागर भटके विमुक्त दिनी कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. बंदिस्त तारेच्या कुंपणात जन्म झालेले आणि सध्या १०३ वर्षे वय असलेल्या समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या अधिपत्याखाली भाटनगर पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसदस्य डब्बू आसवानी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त गोरख लिमन, कामगार नेते तथा भाट समाज सेवा ट्रस्टचे शहर अध्यक्ष मनोज माछरे, माजी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, भटक्या-विमुक्त जाती-जमाती सामाजिक आधार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ सावंत, ललित कासार, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके, निवृत्त सहायक आयुक्त सुभाष माछरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते नेताजी शिंदे, अक्षय माछरे, विक्की तामचीकर, भूपेंद्र तामचीकर, अभय भाट, रामचंद्र भाट, संजू घमंडे, सुभाष माछरे, विशाल भाट, धीरज तामचीकर, नरेंद्र तामचीकर, अॅड. वर्षा तामचीकर, वनिता अभंगे, डॉ. स्नेहा माछरे, नम्रता भाट, शीतल भाट, अॅड. अजय नवले, रामभाऊ बाटुंगे, जतन बार्डे, मनोहर अबवेकर, कुलदीप तमायची आदी उपस्थित होते. 

भटक्या-विमुक्त समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती तसेच समाजाची दशा आणि विकासाची दिशा या विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी मार्गदर्शन केले. भटका विमुक्त समाज आजदेखील हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. गुन्हेगार जमातीचा शिक्का पुसून प्रगत जीवनाचा मार्ग अनुसरण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा अंगीकारणे आवश्यक आहे. शिक्षण हा प्रगतीचा एकमेव मार्ग असून शिक्षित समाज उन्नती करू शकतो असे विचार परिसंवादातून व्यक्त करण्यात आले. 

मंदार देशपांडे म्हणाले, भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या समाजाच्या मागण्या शासन दरबारी सोडवण्यासाठी तसेच महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. 

समाजसेवा, अध्यात्म, संस्कार आणि मानवकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजप्रबोधन, सदाचार, मानवता, सेवा आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश त्यांनी सातत्याने समाजापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

“समाजाची प्रगती केवळ आश्वासनांनी किंवा मदतीने होत नाही, तर शिक्षण, रोजगार, उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सक्षम केल्याने होते. आपल्या समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची, प्रत्येक तरुणाला रोजगाराची आणि प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. आपल्या हक्कांच्या मागण्या शासनासमोर ठामपणे मांडून त्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद निर्माण करूया आणि शिक्षण, उद्योग व स्वावलंबनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणूया,” असे प्रतिपादन सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांनी केले. तारेच्या कुंपणातील कटू आठवणी आणि त्यावेळी झालेला अन्याय यावेळी त्यांनी विशद केला. भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासमोर भटक्या विमुक्त जातीचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यावेळी झालेल्या भेटीचे प्रसंग देखील शिवलाल यांनी सांगितले. ७५ वा भटके-विमुक्त दिवस हा समाजाच्या सामाजिक प्रगतीचा, एकजुटीचा आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षण, रोजगार, सामाजिक स्थैर्य आणि समाजाचा मुख्य प्रवाहातील सहभाग वाढविण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

“शिक्षण, संघटन आणि एकजूट हीच समाजाची ताकद” – विशेष अधिकारी किरण गायकवाड

“भटक्या-विमुक्त समाजाची लढाई ही एका जातीची नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीची लढाई आहे. त्याचप्रमाणे आपल्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपल्या समाजाचा संघर्षमय इतिहास विसरता कामा नये. मानसिक गुलामगिरीची कुंपणे तोडण्यासाठी शिक्षण, संघटन आणि एकजूट हीच आपली ताकद आहे. प्रत्येक मुलगा-मुलगी शिकली पाहिजे. आपल्या समाजाचे भविष्य घडविण्यासाठी निरंतर सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. मनोज माछरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या हक्क अधिकारासाठी संघटनात्मक एकजूट उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सायंकाळच्या सत्रात निर्मिक आर्ट्स मीडिया प्रस्तुत ‘भटके-विमुक्त लोकसंस्कृतीचा जागर’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील कला, संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लोककलांच्या सादरीकरणासह मोरया ढोल-ताशा पथकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आरोग्य उपक्रमांतर्गत ३१ नागरिकांनी रक्तदान केले, तर २१० नागरिकांनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. रक्तदान हे जीवनदानाचे कार्य असून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश रावळकर यांनी तर आभार विष्णू भाट यांनी मानले.


ताथवडे येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी


आमदार शंकर जगताप यांच्यासह रवि भिलारे, रितू कांबळे, सिद्धेश सोनकवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १ सप्टेंबर २०२६ : ताथवडे येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून POCSO कायद्यानुसार जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयामार्फत प्रकरणाचा तातडीने निकाल लावावा, तसेच दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या रितू कांबळे यांनी माध्यमांना दिली. या संदर्भात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली रवि भिलारे, रितू कांबळे आणि सिद्धेश सोनकवडे यांनी मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी ताथवडे येथील घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत आरोपीविरुद्ध कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने प्रकरणात कोणतीही दिरंगाई करू नये अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि प्रकरणाच्या कार्यवाहीत कोणतीही दिरंगाई होऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पीडितांना तातडीने न्याय मिळणे आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. पीडित मुलींना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,” अशी भूमिका आमदार शंकर भाऊ जगताप यांच्यासह उपस्थित सहकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोबर लाईफ व्यसनमुक्ती केंद्रात बंधुभाव जपला

बंधू प्रेम, विश्वास, आपुलकी आणि व्यसनमुक्त जीवन हाच आजच्या रक्षाबंधन दिनाचा संकल्प __प्रा. संजय इंगळे 

| सांगावा न्यूज | लोणावळा, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त सोबर लाईफ व्यसनमुक्ती केंद्र, लोणावळा येथे भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक २८ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते सेबस्टीन जोसेफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी व्यसनमुक्तीच्या प्रवासात प्रेम, आपुलकी, कुटुंबीयांचा आधार तसेच समाजाची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना समाजाने स्वीकारून त्यांना नव्या आयुष्याची संधी द्यावी, असे उपस्थितांना आवाहनही त्यांनी केले.

यावेळी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक प्रा.संजय इंगळे यांनी रक्षाबंधनाचे सामाजिक व भावनिक महत्त्व विशद केले. “राखीचा धागा हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक नसून, एकमेकांना आधार देण्याची, चुकीच्या वाटेपासून दूर ठेवण्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारा धागा आहे,” असा संदेश त्यांनी दिला"

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी परस्परांना राखी बांधून बंधू प्रेम, विश्वास, आपुलकी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला. या उपक्रमामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील वातावरण आनंदी व भावनिक झाले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून नात्यांमधील जिव्हाळा, आधार आणि सकारात्मकतेचा संदेश देत व्यसनमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा उपस्थितांना मिळाली.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न ; ८४ विद्यार्थिनी व ५० महिला प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग

जगात समाजात वावरताना स्वतःचे रक्षण स्वतः करावे लागेल, म्हणून आजचे स्वरक्षणाचे धडे विसरू नका__संगीता जगताप (प्राचार्या)

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा पार आयोजित केली. शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, अँटी रॅगिंग सेल, आय सी सी, शिस्त समिती आणि राणीलक्ष्मीबाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  घोलप महाविद्यालयात संपन्न झेलल्या विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात ८४ विद्यार्थिनी व ५० महिला प्राध्यापिकांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

समन्वयक डॉ. विद्या पाठारे आणि डॉ. अमृता इनामदार यांनी महिला व विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाची गरज लक्षात घेता याचे महत्त्व पटवून देऊन स्वतः कार्यक्रमासाठ प्रमुख उपस्थिती दर्शविली. पाहुण्यांनी केवळ मार्गदर्शन न करता सर्व ८४ विद्यार्थिनींकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली. रस्त्यात, बसमध्ये, लिफ्टमध्ये छेडछाड झाल्यास सुटका कशी करावी, हात पकडल्यास अंगठ्याच्या बाजूने हात सोडवणे, मागून हल्ला झाल्यास कोपर व टाचेने प्रतिकार करणे आणि पेन, चावीचा शस्त्र म्हणून वापर करणे याचा प्रत्येक विद्यार्थिनीने प्रत्यक्ष सराव केला. हे प्रशिक्षण केवळ प्रात्यक्षिकापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकीला वैयक्तिकरित्या करून पाहण्याची संधी दिल्याने आत्मविश्वास वाढला. तसेच घरगुती हिंसा विषयी मार्गदर्शन करून १८१, ११२ हेल्पलाईन व कायद्याची माहिती उपस्थित विद्यार्थिनींना दिली.

अध्यक्षीय मनोगतामधे प्राचार्या डॉ. संगीता जगताप म्हणाल्या, "ध्यानचंद जयंतीनिमित्त क्रीडा दिन साजरा करताना विद्यार्थिनींना सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. महाविद्यालयात CCTV व सिव्हिल ड्रेसमधील पोलीस कॉन्स्टेबलमुळे परिसर १००% सुरक्षित आहे. तसेच महाविद्यालयात लैंगिक अत्याचार प्रतिबंध समिती (ICC) सक्रियपणे कार्यरत असून, त्रास झाल्यास विद्यार्थिनींनी घाबरू नये, त्वरित करावी, तिची ओळख गोपनीय ठेवली जाईल. बाहेरील जगात स्वतःचे रक्षण स्वतः करावे लागेल, म्हणून आजचे धडे विसरू नका."

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृता इनामदार यांनी केले तर आभार डॉ. विद्या पाठारे यांनी मानले. डॉ. मनिषा शेवाळे, प्रा. प्रीती जोशी, इतर समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रास्ताविक डॉ. विद्या पाठारे यांनी केले. स्वागत व सत्कार प्राचार्या डॉ. संगीता जगताप आणि महाविद्यालय विकास समिती सदस्या डॉ. चंदा हासे व डॉ. सीमा चौहान यांच्या हस्ते झाला. पाहुण्यांचा परिचय डॉ. दिपाली चिंचवडे यांनी दिला. राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड च्या कल्याणी मॅडम, किरण सर, तेजस्विनी मॅडम आणि प्रशांत सर यांनी मार्गदर्शन केले.




शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

थेरगाव येथील अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी-चिंचवड शहर महिला आघाडीच्या वतीने थेरगाव येथील अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन सण आज उत्साहात साजरा करण्यात आला. संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून महामंडळाच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी-चिंचवड शाखेच्या महिला शहराध्यक्ष रुपालीताई गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी पुणे जिल्ह्याच्या माजी महिला अध्यक्षा अनिताताई मगर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अग्निशमन केंद्रातील मुकेश बर्वे, प्रतिक कांबळे, संभाजी दराडे, ऋषिकेश काळे, प्रतीक खांडगे, निकलेश सुतार, अनिल हाके, तेजस चौगुले, अभिषेक अवताडे, नारायण म्हस्के, संकेत जाधव आणि यश सरोदे या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

जवानांसोबतच महामंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुरुष पदाधिकाऱ्यांनाही राखी बांधून समाजात बंधुभाव जपण्याचा संदेश दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कारेकर, पिंपरी-चिंचवडच्या कोषाध्यक्ष वनिता कारेकर, अमृता गोरे, प्रिती मोरे, सारिका शिंदे आणि पिंपरी-चिंचवडच्या माजी महिला शहराध्यक्ष शुभदा राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव मगर यांनी केले, तर संघटक संतोष गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

         

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

सैनिकांसाठी राख्या पाठवून थेरगाव च्या पीएम श्री माध्यमिक विद्यालयात स्तुत्य उपक्रम


विद्यार्थ्यांना सैनिकांच्या त्यागाची जाणीव होऊन देशसेवेची प्रेरणा मिळाली ___बाबासाहेब राठोड (मुख्याध्यापक)

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक२६ ऑगस्ट २०२६ : भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे विद्यार्थिनींसाठी राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रंगांच्या, आकर्षक व वेगवेगळ्या आकारांच्या राख्या तयार केल्या. दिनांक २५ ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींनी प्रेमाने तयार केलेल्या या राख्या भारतीय सीमांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. 

घरापासून व कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांसोबत भारतीय कुटुंब म्हणून आपण रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त बहीण म्हणून मुलगी म्हणून सैनिकांसोबत आहोत , असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती तसेच सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. राख्या तयार करताना विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. सैनिकांप्रती असलेला आदर आणि देशभक्तीची भावना त्यांच्या कृतीतून प्रकर्षाने जाणवली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका श्रीमती हर्षदा राऊत, श्रीमती मंगल आव्हाड, श्रीमती सोनाली जाधव, श्रीमती तुपे तसेच इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब राठोड म्हणाले, “विद्यालय मागील तीन वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सैनिकांच्या त्यागाची जाणीव होऊन देशसेवेची प्रेरणा मिळाली.

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींसाठी आरोग्यदायी निर्णय; सॅनिटरी पॅड वेंडिंग, डिस्पोजल मशीन बसवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी


महिला डॉक्टर किंवा आरोग्य सेविकांमार्फत दरमहा समुपदेशन सत्रांचे आयोजन होणार __अभिषेक बारणे

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा व स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजल मशीन (इंसिनरेटर) बसवणे आणि मासिक पाळीबाबत नियमित समुपदेशन सत्रे आयोजित करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ११,१९३ इतकी आहे. किशोरवयीन वयातील या विद्यार्थिनींच्या वैयक्तिक आरोग्याची (Menstrual Hygiene) योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळीबाबत योग्य माहितीचा अभाव आणि आवश्यक सुविधांच्या अपूर्णतेमुळे अनेकदा विद्यार्थिनींच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढते. हे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यांना शाळांमध्ये आधुनिक सुविधा व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याद्वारे विद्यार्थिनींना स्वच्छ आणि सुरक्षित सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, वापरलेल्या पॅड्सची सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसवणे, मासिक पाळीशी संबंधित सामाजिक गैरसमज दूर करून विद्यार्थिनींचे योग्य समुपदेशन करणे आणि याद्वारे त्यांची शाळेतील हजेरी नियमित राखणे हा मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत सर्व मनपा माध्यमिक शाळांच्या मुलींच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक मशीन्स बसवण्यात येणार आहेत. तसेच एकूण विद्यार्थिनींसाठी दरमहा आवश्यक सॅनिटरी पॅडचा साठा उपलब्ध केला जाईल. याशिवाय, महिला डॉक्टर किंवा आरोग्य सेविकांमार्फत दरमहा समुपदेशन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या कार्यशाळांमध्ये प्रशिक्षित महिला आरोग्य तज्ज्ञांमार्फत विद्यार्थिनींचे शारीरिक बदल, स्वच्छता आणि आहाराविषयी विशेष मार्गदर्शन केले जाईल तसेच विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत माहितीपत्रके व पुस्तिकांचे वितरण केले जाईल. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापिका व एक महिला शिक्षिकेची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल, जेणेकरून मशीन्सच्या देखभाल-दुरुस्तीचे व या संपूर्ण उपक्रमाचे योग्य नियोजन करता येणार आहे.

"किशोरावस्थेतील विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा विषय आहे. अनेकदा योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी मुलींचे शिक्षण खंडित होते किंवा त्या गैरहजर राहतात. मनपा शाळांमधील विद्यार्थिनींना उत्तम आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांचे शिक्षण कोणत्याही कारणाशिवाय प्रभावित होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आमच्या लेकींना अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणार आहोत."
__अभिषेक बारणे (सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका)

अंतरवाली सराटीला पिंपरी चिंचवडमधून शेकडो मराठा बांधव जाणार

 

मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे काळे यांचे आवाहन

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे होणाऱ्या निर्णय आंदोलनासाठी पिंपरी चिंचवड शहरातून शेकडो मराठा समाजबांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी करून मध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.

मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नसून मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणारे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे या आंदोलनासाठी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. सरकारने यापूर्वी अनेक वेळा मराठा समाजाला आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको तर मराठा आरक्षणाबाबत ठोस आणि निर्णायक निर्णय हवा २९ ऑगस्टचा लढा हा आपल्या हक्कासाठीचा निर्णायक लढा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक मराठा बांधवाने अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील युवक, महिला तसेच मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले असल्याचे काळे यांनी सांगितले.

अनिताताई अशोक मगर "द ग्रेट कलावंत दादासाहेब फाळके" पुरस्काराने सन्मानित


| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ : स्वराज फिल्म प्रोडक्शन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित 'द ' ग्रेट कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड, पुणे येथे नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनिताताई अशोक मगर (माजी पुणे जिल्हा, महिला अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ. विद्यमान व्हाईस चेअरमन, श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्था काळेवाडी) यांना द ग्रेट कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

अनिताताई मगर यांनी आतापर्यंत नाभिक महामंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा, हुतात्मा भाई कोतवाल जयंती व पुण्यतिथी सोहळा सहभाग तसेच कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले. पोलीस बांधवांना राखी बांधून बंधुभाव जपला. जवानांसाठी राखी पाठवून कृतज्ञता व्यक्त केली. अशाविविध सामाजिक व सांस्कृतिक कार्य चालू असताना त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, आदर्श महिला कार्यकर्ता पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय आदर्श माता पुरस्कार देऊन विविध सामाजिक संघटनांनी सन्मानित केले आहे. अनिताताई मगर यांना पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा व ग्रामस्थ जांबे यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.    

दोन सुवर्णांसह नऊ पदकांची कमाई; अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंचे यश


पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी सातारा जिल्ह्यात आपल्या क्रीडा कौशल्याचा दाखवला प्रभाव

| सांगावा न्यूज | वाई, दि. २५ ऑगस्ट २०२६ :
वाई (सातारा) येथे २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल ९ पदकांची कमाई केली. यामध्ये २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

स्पर्धेत शौर्य नेगी आणि विवेक डेढे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तर शरयू धुमाळ, धनश्री शिंपले, श्रेया कदम आणि श्रुतिका मोरे यांनी रौप्यपदक मिळवले. अदिती तांबे, माही तावरे आणि रोहन यादव यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट तंत्र, शिस्त, मेहनत आणि लढाऊ वृत्तीचे प्रभावी प्रदर्शन करत आपल्या संघाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या यशामुळे अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या सर्व खेळाडूंना संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक श्री. अविनाश पवार तसेच वरिष्ठ प्रशिक्षक श्री. आदित्य पवार यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर खेळाडूंनी हे यश संपादन केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडचे मा. स्वीकृत नगरसेवक श्री. नवनाथ नढे यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत त्यांनी भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी आमदारांनी घेतली आढावा बैठक

प्रत्येक प्रलंबित कामासाठी जबाबदार विभाग आणि अधिकारी निश्चित करून कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा __आमदार शंकर जगताप

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहराती औंध रस्त्यावर सांगवी येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा सद्य स्थिती आणि गरज याविषयी आमदार शंकर जगताप यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यासोबतच रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी विविध सुविधांचा आणि प्रलंबित विकासकामांचा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णालयातील MRI, CT स्कॅन आणि एक्स-रे युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार महोदयांसोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता ओपीडीची क्षमता वाढविणे, उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करणे आणि रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

रुग्णालयात आपत्कालीन उपचारांसाठी उभारण्यात येत असलेला १०० खाटांचा क्रिटिकल केअर ब्लॉक लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच बर्न वॉर्ड, SNCU विभाग, अतिरिक्त आंतररुग्ण कक्ष, STP व ETP प्रकल्प, पोलीस मदत केंद्र आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालयाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रुग्णालयातील स्वच्छता, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अग्निसुरक्षा, औषध भांडार, पार्किंग, लिफ्ट तसेच इतर मूलभूत सुविधांचीही पाहणी करण्यात आली. या सुविधा नियमितपणे सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

महिलांच्या सुविधेसाठी रुग्णालय परिसरात तसेच बाहेरील भागात ‘पिंक टॉयलेट’ उभारण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. रुग्णालय आणि अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडी, कचरा आणि भटक्या प्राण्यांची समस्या दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची नियमित देखरेख करून ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा रुग्णालय परिसरातील पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, त्यासाठीही पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रत्येक प्रलंबित कामासाठी जबाबदार विभाग आणि अधिकारी निश्चित करून कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. सांगवी जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, सुरक्षित, सुविधायुक्त आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीस नगरसेविका तृप्ती कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री थोपटे, उरो रुग्णालय अधीक्षक डॉ. अभिजीत होसमनी, अग्निशामक अधिकारी व्यंकटेश दुर्वास, उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, नेत्रचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे (आयुष), सांगवी जिल्हा रुग्णालय समिती सदस्य डॉ. देविदास शेलार, अधीक्षक परिचारिका मंगल जाधव, प्रशासकीय अधिकारी दत्ता शृंगारे, पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील, वाहतूक निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पाणीपुरवठा कार्यकारी उपअभियंता महेश बरीदे, प्रशांत कोटकर (ह क्षेत्रीय कार्यालय), उपअभियंता सुनील पवार (बीआरटी), राष्ट्रीय आरोग्य अभियान उपअभियंता मंदार कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता प्रतीक्षा काळे (सिव्हील), तानाजी थोपटे (इलेक्ट्रिक), अभियंता अनिल गाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.