| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड | १७ जुलै २०२६ : महाविद्यालयीन युवती - युवकांमध्ये अमली पदार्थांचा वाढता विळखा पाहता या विळख्याला आळा घालण्यासाठी तसेच अमली पदार्थ विक्री व्यापारा विरुद्ध ठोस उपाययोजना या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पिंपरी येथे आयोजित या कार्यक्रमात सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे अमली पदार्थ, त्यांचे दुष्परिणाम, एन.डी.पी.एस. कायद्यातील तरतुदी तसेच व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासह कुटुंब, शिक्षण, करिअर आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अमली पदार्थ विरोधी पथक (मो. ६८०००२३२३०), मानस हेल्पलाईन १९३३ किंवा पोलीस कंट्रोल रूम ११२ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तज्ज्ञ डॉ. हनुमंत हाडे यांनी तंबाखू व अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर मार्गदर्शन केले. तसेच विल्यम साळवी (व्यवस्थापक, विमल व्यसनमुक्ती केंद्र) यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व, व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय आणि निरोगी जीवनशैलीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलिस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिसांच्या या जनजागृती अभियानाचे स्वागत केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा