Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळा


वर्षे सरली, आठवणी कायम!

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ : शाळा सुटली, वर्ग बदलले आणि प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र शाळेच्या आठवणी आणि मैत्रीची नाळ वर्षानुवर्षे तितकीच घट्ट राहिली. याच जिव्हाळ्याचा आणि जुन्या आठवणींचा अनुभव हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ इंग्रजी माध्यमाच्या बॅचच्या स्नेहमेळाव्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी श्री कृष्ण पॅलेस हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने अनेक वर्षांनंतर माजी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक पुन्हा एकत्र आले.

विद्यार्थ्यांच्या आग्रहाला मान देत शिक्षक ॲड. आशुतोष रानडे, रमेश गाढवे, अनिथा कदम (स्टीवन मिस), कविता गायकवाड आणि मुकेश पवार आवर्जून उपस्थित राहिले. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या या पुनर्भेटीने कार्यक्रमाला भावनिक किनार लाभली. शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला तसेच आपले मनोगत व्यक्त केले. ‘गुरुंचे ऋण कधीही फेडता येत नाही’ या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शक यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी विद्यालयासह शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील दिवंगत शिक्षक, कर्मचारी तसेच दिवंगत माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे श्लोक म्हणत आपल्या गुरुजनांना मानवंदना दिली.

रियुनियनच्या निमित्ताने विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. संगीत, मनोरंजन, हास्य-विनोद आणि विविध खेळांमुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे शालेय जीवनातील खोड्या, गमती-जमती आणि अविस्मरणीय प्रसंगांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रपरिवाराने शाळेच्या आठवणींमध्ये रमून आनंदाचे क्षण अनुभवले.

‘शाळा म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी, संस्कार आणि नाती आहेत’ याची प्रचिती या स्नेह मेळाव्यातून आल्याची भावना यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनी बोलून दाखवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीन अझीझ आणि दिपाली दंदाडे यांनी केले, तर प्राजक्त घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही हे स्नेहबंध असेच कायम ठेवण्याचा संकल्प केला. उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या अविस्मरणीय रियुनियनचे आयोजन प्राजक्त घोरपडे, विक्रांत वर्मा, अमीन अझीझ, दिपाली दंदाडे आणि गझलनाझ अल्फोन्स यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ इंग्रजी माध्यमाच्या बॅचचा हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवावा, असा ठरला अशी भावना सागर सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा