| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहराती औंध रस्त्यावर सांगवी येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा सद्य स्थिती आणि गरज याविषयी आमदार शंकर जगताप यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यासोबतच रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी विविध सुविधांचा आणि प्रलंबित विकासकामांचा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णालयातील MRI, CT स्कॅन आणि एक्स-रे युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार महोदयांसोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता ओपीडीची क्षमता वाढविणे, उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करणे आणि रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
रुग्णालयात आपत्कालीन उपचारांसाठी उभारण्यात येत असलेला १०० खाटांचा क्रिटिकल केअर ब्लॉक लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच बर्न वॉर्ड, SNCU विभाग, अतिरिक्त आंतररुग्ण कक्ष, STP व ETP प्रकल्प, पोलीस मदत केंद्र आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालयाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रुग्णालयातील स्वच्छता, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अग्निसुरक्षा, औषध भांडार, पार्किंग, लिफ्ट तसेच इतर मूलभूत सुविधांचीही पाहणी करण्यात आली. या सुविधा नियमितपणे सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
महिलांच्या सुविधेसाठी रुग्णालय परिसरात तसेच बाहेरील भागात ‘पिंक टॉयलेट’ उभारण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. रुग्णालय आणि अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडी, कचरा आणि भटक्या प्राण्यांची समस्या दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची नियमित देखरेख करून ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा रुग्णालय परिसरातील पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, त्यासाठीही पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रत्येक प्रलंबित कामासाठी जबाबदार विभाग आणि अधिकारी निश्चित करून कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. सांगवी जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, सुरक्षित, सुविधायुक्त आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस नगरसेविका तृप्ती कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री थोपटे, उरो रुग्णालय अधीक्षक डॉ. अभिजीत होसमनी, अग्निशामक अधिकारी व्यंकटेश दुर्वास, उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, नेत्रचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे (आयुष), सांगवी जिल्हा रुग्णालय समिती सदस्य डॉ. देविदास शेलार, अधीक्षक परिचारिका मंगल जाधव, प्रशासकीय अधिकारी दत्ता शृंगारे, पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील, वाहतूक निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पाणीपुरवठा कार्यकारी उपअभियंता महेश बरीदे, प्रशांत कोटकर (ह क्षेत्रीय कार्यालय), उपअभियंता सुनील पवार (बीआरटी), राष्ट्रीय आरोग्य अभियान उपअभियंता मंदार कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता प्रतीक्षा काळे (सिव्हील), तानाजी थोपटे (इलेक्ट्रिक), अभियंता अनिल गाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा