पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी सातारा जिल्ह्यात आपल्या क्रीडा कौशल्याचा दाखवला प्रभाव
| सांगावा न्यूज | वाई, दि. २५ ऑगस्ट २०२६ :
वाई (सातारा) येथे २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल ९ पदकांची कमाई केली. यामध्ये २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
स्पर्धेत शौर्य नेगी आणि विवेक डेढे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तर शरयू धुमाळ, धनश्री शिंपले, श्रेया कदम आणि श्रुतिका मोरे यांनी रौप्यपदक मिळवले. अदिती तांबे, माही तावरे आणि रोहन यादव यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट तंत्र, शिस्त, मेहनत आणि लढाऊ वृत्तीचे प्रभावी प्रदर्शन करत आपल्या संघाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या यशामुळे अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या सर्व खेळाडूंना संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक श्री. अविनाश पवार तसेच वरिष्ठ प्रशिक्षक श्री. आदित्य पवार यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर खेळाडूंनी हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडचे मा. स्वीकृत नगरसेवक श्री. नवनाथ नढे यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत त्यांनी भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्टिमेट स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्ट्सचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा