Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींसाठी आरोग्यदायी निर्णय; सॅनिटरी पॅड वेंडिंग, डिस्पोजल मशीन बसवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी


महिला डॉक्टर किंवा आरोग्य सेविकांमार्फत दरमहा समुपदेशन सत्रांचे आयोजन होणार __अभिषेक बारणे

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा व स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजल मशीन (इंसिनरेटर) बसवणे आणि मासिक पाळीबाबत नियमित समुपदेशन सत्रे आयोजित करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ११,१९३ इतकी आहे. किशोरवयीन वयातील या विद्यार्थिनींच्या वैयक्तिक आरोग्याची (Menstrual Hygiene) योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळीबाबत योग्य माहितीचा अभाव आणि आवश्यक सुविधांच्या अपूर्णतेमुळे अनेकदा विद्यार्थिनींच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढते. हे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यांना शाळांमध्ये आधुनिक सुविधा व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याद्वारे विद्यार्थिनींना स्वच्छ आणि सुरक्षित सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, वापरलेल्या पॅड्सची सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसवणे, मासिक पाळीशी संबंधित सामाजिक गैरसमज दूर करून विद्यार्थिनींचे योग्य समुपदेशन करणे आणि याद्वारे त्यांची शाळेतील हजेरी नियमित राखणे हा मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत सर्व मनपा माध्यमिक शाळांच्या मुलींच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक मशीन्स बसवण्यात येणार आहेत. तसेच एकूण विद्यार्थिनींसाठी दरमहा आवश्यक सॅनिटरी पॅडचा साठा उपलब्ध केला जाईल. याशिवाय, महिला डॉक्टर किंवा आरोग्य सेविकांमार्फत दरमहा समुपदेशन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या कार्यशाळांमध्ये प्रशिक्षित महिला आरोग्य तज्ज्ञांमार्फत विद्यार्थिनींचे शारीरिक बदल, स्वच्छता आणि आहाराविषयी विशेष मार्गदर्शन केले जाईल तसेच विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत माहितीपत्रके व पुस्तिकांचे वितरण केले जाईल. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापिका व एक महिला शिक्षिकेची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल, जेणेकरून मशीन्सच्या देखभाल-दुरुस्तीचे व या संपूर्ण उपक्रमाचे योग्य नियोजन करता येणार आहे.

"किशोरावस्थेतील विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा विषय आहे. अनेकदा योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी मुलींचे शिक्षण खंडित होते किंवा त्या गैरहजर राहतात. मनपा शाळांमधील विद्यार्थिनींना उत्तम आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांचे शिक्षण कोणत्याही कारणाशिवाय प्रभावित होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आमच्या लेकींना अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणार आहोत."
__अभिषेक बारणे (सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा