मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे काळे यांचे आवाहन
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे होणाऱ्या निर्णय आंदोलनासाठी पिंपरी चिंचवड शहरातून शेकडो मराठा समाजबांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी करून मध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.
मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नसून मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणारे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे या आंदोलनासाठी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. सरकारने यापूर्वी अनेक वेळा मराठा समाजाला आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको तर मराठा आरक्षणाबाबत ठोस आणि निर्णायक निर्णय हवा २९ ऑगस्टचा लढा हा आपल्या हक्कासाठीचा निर्णायक लढा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक मराठा बांधवाने अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील युवक, महिला तसेच मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले असल्याचे काळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा