Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

थेरगावमधील केजुदेवी उद्यान आणि केजुबाई बंधारा विकासाला मंजुरी; ‘वनगंध’ प्रकल्पांतर्गत साकारणार जलक्रीडा पर्यटन केंद्र __(अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती)


नदीचे सौंदर्य वाढणार, नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार

| सांगावा न्यूज | (पिंपरी चिंचवड) थेरगाव, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारा आणि सौंदर्यात भर घालणारा ‘वनगंध’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांच्या भेटीला येत आहे. या प्रकल्पांतर्गत थेरगाव येथील बोट क्लब व केजुदेवी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या नावामध्ये सुधारणा करून तिथे जलक्रीडा पर्यटन विकसित करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच अभिषेक बारणे यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प विकासाची सविस्तर माहिती घेतली. तसेच, संबंधित विभागाला आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना केल्या. या प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सिद्धेश्वर बारणे, 'मे. शिल्पी आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्स'चे वास्तुविशारद पारस एस. नेत्रगावकर हे देखील उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना निसर्ग, पाणी आणि सार्वजनिक जीवनाशी जोडणारा सर्वसमावेशक परिसर या प्रकल्पातून निर्माण केला जात आहे. नदी नागरिकांसाठी खुली करणे आणि वनातून फेरफटका मारण्याचा अनुभव देणारे सार्वजनिक केंद्र निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची रचना मनोरंजन, पर्यावरण आणि संस्कृती यांच्या मिलाफातून करण्यात आली असून, येथे येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य प्रवेशद्वार, आगमन क्षेत्र आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

या प्रकल्पाच्या मुख्य आकर्षणांमध्ये ॲम्फीथिएटर, समुदाय बैठक व्यवस्था, फोटो बूथ, मचान, तसेच बोटिंग जेट्टी, फेरी बोट आणि विविध जलक्रीडांचा (वॉटर स्पोर्ट्स) समावेश आहे. याशिवाय आरोग्य आणि विहारासाठी जॉगिंग ट्रॅक, मुलांचे खेळण्याचे क्षेत्र, निसर्गवाटा (नेचर ट्रेल्स), पुष्पोद्यान, इको पार्क, वॉच टॉवर, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष जागा, विलोभनीय घाट आणि एक मंदिर परिसर उभारला जाणार आहे.

निसर्ग सफर, विपुल हिरवाई आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचा सुंदर मेळ या प्रकल्पात पाहायला मिळणार आहे. हा परिसर केवळ एक पारंपारिक उद्यान न राहता, नदी, निसर्ग आणि समाज यांच्यात निरंतर संवाद साधणारे एक चैतन्यपूर्ण शहरी केंद्र म्हणून आकार घेणार असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

"पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि उत्तम विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. थेरगाव येथील ‘वनगंध’ प्रकल्पामुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढणार नाही, तर याठिकाणी नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा एक नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होईल. हा प्रकल्प नदी, निसर्ग आणि समाज यांना जोडणारा एक आदर्श ठेवा ठरेल". 
__अभिषेक बारणे, सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा