विविध विषयांचे आणि कार्यपद्धतींचे व्यावहारिक ज्ञान कमवा शिका योजनेतून विद्यार्थांना आत्मसात
| सांगावा न्यूज |सांगवी, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व कमवा व शिका योजनेचे उद्घाटन समारंभ दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ रोजी बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथे करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कामाची प्रतिष्ठा, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आत्मसात करावी, या उद्देशाने ‘कमवा व शिका’ योजनेचे प्रभावीपणे कार्य सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कामाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर दिला जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके( सहयोगी अधिष्ठता, भौतिकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ) होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसवरील तसेच संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना समान हक्क आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा या योजनेमागील मूलभूत उद्देश प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सांगितले. तर तसेच ‘कमवा व शिका’ योजनेसोबतच निर्भय कन्या अभियान, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास यांसह ३३ हून अधिक विद्यार्थी विकासाभिमुख उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. आपत्तीच्या प्रसंगी केवळ प्रेक्षक न राहता जखमी व्यक्तीला तातडीने मदत करण्याची सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असेही आवाहन करण्यात आले.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. ‘कमवा व शिका’ योजना ही केवळ शारीरिक श्रम करण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे माध्यम ठरावी, असा संदेश यावेळी डॉ. विजय घाडगे यांच्याद्वारे देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गवत काढणे, बागकाम करणे याबरोबरच प्रशासकीय फायलिंग, प्रोजेक्ट ड्राफ्टिंग, तांत्रिक उपकरणांचा वापर यांसारखी कामे शिकावीत, यावर भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या विभागांत काम करण्याची संधी दिल्यास त्यांना विविध विषयांचे आणि कार्यपद्धतींचे व्यावहारिक ज्ञान मिळेल, असेही सांगण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालक म्हणून डॉ. रमाकांत कस्पटे हे भूमिका बजावत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना कामातून अनुभव, अनुभवातून ज्ञान आणि ज्ञानातून व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे, असा संदेश यावेळी दिला. सदर उद्घाटन प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारत राठोड, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटनाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास मंडळातील समिती सदस्य प्रा. शीतल शेकडे, प्रा. गणेश कटारिया, प्रा.वैभव बांगले तसेच प्रा. संतोष सास्तुरकर आणि प्रा. महेश खरात, प्रा.प्रविण खाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमाकांत कस्पटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अरबाज सैय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रणीत पावले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा