Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ९ जुलै, २०२६

मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू

 

मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. ९ जुलै २०२६ : काल ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून अविरतपणे चालू असलेल्या या बचावकार्यातील शोधमोहीमेमध्ये आज ९ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका नागरिकाला बाहेर काढण्यात आले असून  या गंभीर अवस्थेतील नागरिकाला पिंपरी  येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भावेश वाणी असे आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती ते मृत असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे. 

महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. सुरुवातीस अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे ५ नागरिक घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले. मात्र इमारतीत १८ व्यक्ती अडकून पडले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य सुरू केले. रात्री ८ पर्यंत या पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह या ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. या  तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. इमारतीत अडकून पडलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविण्यात आली. रात्री दीड वाजेपर्यंत बचावकार्यादरम्यान ३ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. 

अविरतपणे बचावकार्य सुरू असताना शोधमोहीम हाती घेण्यात आली. याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सकाळी ९ च्या सुमारास भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या वाणी यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी ते मृत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

दरम्यान, अद्यापही इमारतीत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. यादरम्यान आज खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क कार्यालयाने प्रेस नोट जारी करून माध्यमांना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा