शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न
मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६
ताथवडे येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६
धर्मेंद्र सोनकर विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल! मागासवर्गीय आयोगाचे बनावट लेटरहेड आणि भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करून शासकीय सुविधांचा लाभ घेतल्याचा ठपका
सोमवार, १० ऑगस्ट, २०२६
राजेशिर्के घराण्याकडून धर्मवीरगडावर येणाऱ्यांचा सन्मान
रविवार, ९ ऑगस्ट, २०२६
’वैज्ञानिक दृष्टिकोन-युक्त शाळा’ ; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लक्षवेधी उपक्रम
बुधवार, २९ जुलै, २०२६
अल्पवयीन दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ६१ वर्षीय आरोपी अटकेत; वाकड पोलिसांकडून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
शनिवार, २५ जुलै, २०२६
विद्यार्थी आंदोलनाचा विजय; अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
विद्यार्थ्यांनी विश्वगुरुला झुकविले! मोदी सरकार तरुणाईसमोर नतमस्तक ; धर्मेंद्र प्रधानांना खुर्चीवरून खाली खेचले!
"विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय" CJP आणि विद्यार्थ्यांचे मोठे यश
| सांगावा न्यूज | नवी दिल्ली, दिनांक २५ जुलै २०२६ : सिजेपी चे अध्यक्ष अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घेऊन शेवटी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिनांक २५ जुलै रोजी राजीनामा दिला. गेली महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर वर विद्यार्थांनी धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी आंदोलन उपोषण केले होते. त्याला देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी व विविध पक्ष संघटनांनी पाठिंब दिला होता. गेल्या २० तारखेला संसद भवनाकडे कूच करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींवर दिल्ली पोलिसांनी लाठी चार्ज केल्यामुळे देखील केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली होती. संविधानिक व अहिंसेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाने पोलिसांच्या आणि सरकारच्या अहिंसक मार्गाच्या भीतीला न जुमानता केलेले आंदोलनं आणि त्यांच्या मागणीला आलेले यश म्हणजे हुकूमशाहीवर लोकशाही मार्गाने मिळविलेला विजय आहे असे सामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे. विद्यार्थ्यांनी विश्वगुरुला झुकविले! मोदी सरकार पोरांसमोर नतमस्तक ; धर्मेंद्र प्रधानांना खुर्चीवरून खाली खेचले! अशा प्रतिक्रिया साधारण माध्यमांवर व्यक्त केल्या जात आहेत.
देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक गट आणि विरोधी पक्षांनी उभारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करत विद्यार्थ्यांना उद्देशून एक खुले पत्र जारी केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, " गेल्या चार दशकांपासून ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा त्यांनी नेहमीच आदर केला आहे. NEET-UG परीक्षेतील अनियमिततेची दखल घेत केंद्र सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले, प्रकरण सीबीआयकडे सोपविले आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतला. सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम केले. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि परीक्षा माफियांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार कटिबद्ध" अशा भावना राजीनामा देत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केल्या.
धर्मेंद्र प्रधान हे पुढे म्हटले की, मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे त्यांना वैयक्तिकरीत्या दुःख झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही कायदेशीर किंवा राजकीय संघर्षात अडकू नये, हीच त्यांची भूमिका आहे. देशातील युवकांची शक्ती ही भारताची खरी ताकद असून त्यांना भ्रमित करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा पत्रात त्यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन, मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही देशसेवा आणि युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी राजीनामा दिला. असे असले तरी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी मोदी सरकारने घेतला वेळ, आंदोलनात विद्यार्थ्यांवर केलेला लाठी हल्ला, त्यात शहीद झालेली विद्यार्थिनी , अधू अपंग झालेल विद्यार्थी, तरुणांचा वाया गेलेला परत मिळणार आहे का हा प्रश्न अनुत्तरित असून त्यामुळे सरकारची विश्वासार्हता जनमानसात कमी झाली आहे. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित संघटनांनी या घडामोडीला "विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय" असे संबोधले असून, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याची मागणी कायम ठेवली आहे.
अभिजित दिपके च्या रूपाने एका मराठी पोराने दिल्लीत नेतृत्व करून केलेले आंदोलन म्हणजे दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा अशा भावना देखील मराठी मराठी लोकं व्यक्त करीत आहेत.
विद्यार्थी आंदोलनाचा विजय; अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
मंगळवार, १४ जुलै, २०२६
अखेर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ; मोशी कचरा डोंगर कोसळून झालेल्या गंभीर अपघातात कामगार मृत्यू प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल
रविवार, १२ जुलै, २०२६
कंपनी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे आदेश : मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण
दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कधी? हा प्रश्न अनुत्तरितच
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डे पो दुर्घटनेबाबत प्राथमिक चौकशी चे काम तातड़ी ने पूर्ण करावे व संबंधित कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा सूचना आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्याना दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
मोशी कचरा ढिगारा कोसळून ईमारत दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि सबंधित कंपनीने मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली खरी परंतु त्यातून त्यांचा जीव तर परत येणार नाही केवळ आर्थिक दिलास यातून मिळेल असे असले तरी यातील दोषींवर कडक कारवाई कधी होणार हा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंपनीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले खरे परंतु या गंभीर दुर्घटनेस कारणीभूत असलेले अधिकारी यांच्यावर देखील मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहेत. कारण एवढे मोठे अनधिकृत बांधकाम तसेच नियमांची पायमल्ली करून उंच च्या उंच कचऱ्याचे महाकाय डोंगर होईपर्यंत सबंधित विभागाचे महापालिका अधिकारी काय झोपी गेले होते का की त्यांनी जाणून बुजून काही लाभासाठी दुर्लक्ष केले ज्याचा परिणाम हा मोठा गंभीर अपघात घडला. त्यात ९ कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले. मोशी कचरा ढिगारा दुर्घटनेत संबंधित कंपनी बरोबर दोषी अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना आणि सामान्य नागरिक करीत आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कोणालाही सोडता कामा नये त्यांना शिक्षा आली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. आता येणारा काळच ठरवेल की महापालिका आयुक्त कुणा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करतील की सरसकट दोषींवर कारवाई करतील.
शनिवार, ११ जुलै, २०२६
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू
डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ : राज्यस्तरीय इस्रो अवकाश प्रदर्शन भेट परीक्षेत वर्ग 2 च्या कुमारी आरोही नरगाळे प्रथम
महाराष्ट्र राज्यातून इंग्रजी माध्यमामधून प्रथम क्रमांक आला
| सांगावा न्यूज | फलटण / सातारा (दिनांक ११) : डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय इस्रो (ISRO) अवकाश प्रदर्शन भेट परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी (फलटण) येथील विद्यार्थिनी कुमारी आरोही आनंद नरगाळे हिने इंग्रजी माध्यमातून १०० पैकी ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची बेंगलोर येथे इसरो प्रदर्शन व्हिजिट साठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरोहीचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) आहे. तिचे वडील रोजगारानिमित्त फलटण येथे नोकरी करत असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. "आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात शास्त्रज्ञ बनणार," असा निर्धार व्यक्त करत आरोहीने आपल्या यशामागील प्रेरणा सांगितली. तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आरोहीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, नातेवाईक तसेच हिप्परगा (रवा) गावातील ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शुक्रवार, १० जुलै, २०२६
अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा __ प्रकाश आंबेडकर
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. १० जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार - मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीभोवतालचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अधिकची यंत्रसामग्री वापरून या कामाला गती देण्यात आली असून इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. शिवाय, इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या जीविताची दक्षता घेऊन काळजीपूर्वक ही मोहीम हाताळली जात आहे.
घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेऊन पुढील बचावकार्याच्या रणनीतीवर चर्चा केली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे कसे बाहेर काढता येईल याबद्दल प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती आणि इमारतीची सद्यस्थिती याचा सर्व बाजूने विचार करून रणनीती ठरवण्यात आली आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि मशिनरी उपलब्ध ठेऊन मशिनरी कार्यरत आहेत. घटना घडून जवळपास ४५ तासांपेक्षा अधिक कालखंड झाला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना तसे निर्देश दिले आहेत, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले आहेत.
इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीत अडकलेल्या ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या जागी अडकले आहेत त्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बचावकार्याला गती देण्यात आली आहे, अशी माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली आहे.
माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची घटनास्थळाला भेट
यादरम्यान, आज माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटना आणि सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा असे ते म्हणाले. तसेच इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे यांनी घटनास्थळी पाहणी करून साधला इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद
आज महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. सध्या सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती देत, सर्व यंत्रणा समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने कार्यरत असून अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.
गुरुवार, ९ जुलै, २०२६
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत सुरक्षित प्रवेश करून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भोवतालचा मलबा हटविण्याचे काम सुरू
घटनास्थळी भेट देऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली बचाव यंत्रणेशी चर्चा
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. ९ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेतील अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दुर्घटनाग्रस्त इमारती भोवतालचा मलबा हटवला जात असून इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. या इमारतीत जवानांना प्रवेश करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बचावकार्याची सद्यस्थिती, शोधमोहीमेची प्रगती, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामग्री, तांत्रिक साधनांचा वापर तसेच पुढील नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देत, विविध यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय ठेवून कोणतीही कसर न ठेवता शोध व बचावकार्य सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारतीय सैन्य दलाचे कर्नल आर. के. तिवारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सेकंड कमांड दीपक तिवारी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्यातील पुढील मोहिमेबद्द्ल माहिती दिली. ते म्हणाले, दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षित व सहजतेने प्रवेश करणे कठीण जात आहे. त्यामुळे इमारतीच्या आजुबाजूला असलेला मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय, बचावकार्य करताना इमारतीचा धोकादायक भाग अडथळा ठरू नये यासाठी तो हटविण्याचे काम सुरू असून इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षितपणे आत प्रवेश करून अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी समन्वयाने मोहीम सुरू करण्याचे नियोजन आहे. यातून निश्चितपणे आत अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सध्या ३ जेसीबी आणि पोकलेन तसेच डंपरच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
"घटनास्थळी चालू असलेल्या बचावकार्याच्या प्रत्येक घडामोडीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमारत एका बाजूने झुकली असल्याने आणि इमारतीचे बांधकाम एका बाजूने ढासळले असल्याने अडचणी येत आहेत. एका बाजूचा मलबा हटविल्यानंतर इमारतीचा जो अस्थिर भाग आहे तो स्थिर झाल्यानंतर आतमध्ये जवानांना प्रवेश करण्यासाठी पुरेसा सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाईल. या बचावकार्यात सहभागी असलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी घटनास्थळाची सद्यस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा विचार करून बचावकार्याची योजना बनवली असून अडकलेले नागरिक सुखरुप बाहेर काढले जातील असा विश्वास आहे"
__डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त ; पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू
मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. ९ जुलै २०२६ : काल ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून अविरतपणे चालू असलेल्या या बचावकार्यातील शोधमोहीमेमध्ये आज ९ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका नागरिकाला बाहेर काढण्यात आले असून या गंभीर अवस्थेतील नागरिकाला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भावेश वाणी असे आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती ते मृत असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. सुरुवातीस अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे ५ नागरिक घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले. मात्र इमारतीत १८ व्यक्ती अडकून पडले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य सुरू केले. रात्री ८ पर्यंत या पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह या ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. या तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. इमारतीत अडकून पडलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविण्यात आली. रात्री दीड वाजेपर्यंत बचावकार्यादरम्यान ३ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
अविरतपणे बचावकार्य सुरू असताना शोधमोहीम हाती घेण्यात आली. याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सकाळी ९ च्या सुमारास भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या वाणी यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी ते मृत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, अद्यापही इमारतीत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. यादरम्यान आज खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क कार्यालयाने प्रेस नोट जारी करून माध्यमांना दिली.
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार __मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला शाश्वत, सुरक्षित आणि भविष्योन्मुख पाणीपुरवठा
| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक ३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’ हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि सातत्यपूर्ण संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना व मतांचा पूर्ण आदर राखूनच याबाबत निर्णय घेतले जातील. स्थानिक शेतकरी, सर्व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय विभाग यांच्याशी व्यापक चर्चा, परस्पर संवाद आणि विश्वासाच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज दिनांक ३ जुलै रोजी विधानभवन येथे पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव जयंत बोरकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय आयुक्त पुणे शितल उगले-तेली आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात वाढत्या नागरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या गरजांमुळे पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर झाला नाही तर भविष्यात गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पासंदर्भात शासन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास पूर्णपणे तयार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील यामध्ये पुढाकार घ्यावा. शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण व्हावीत आणि त्यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, याची काळजी घेतली जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही विकास प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा लोकांचा विश्वास संपादन करून तो पुढे नेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष, संबंधित विभाग आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कायम ठेवत भविष्यातील गरजांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असून, विकासासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या अनेक दशकांतील निर्णयांचा संपूर्ण भार आजच्या पिढीवर टाकून चालणार नाही. मजबूत पाया तयार केल्याशिवाय कोणताही विकास प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे महानगर प्रदेशासाठी सन २०५० पर्यंतचे दीर्घकालीन पाणी नियोजन करण्याचे निर्देश दिले. वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज, नवीन जलस्रोतांचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर यासाठी समन्वित आराखडा तयार करण्यास त्यांनी सांगितले.
तसेच उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. औद्योगिक, व्यावसायिक, उद्याने, बांधकामे आणि इतर बिगर-पेयजल वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला शाश्वत, सुरक्षित आणि भविष्योन्मुख पाणीपुरवठा
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण केले. पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे.
प्रस्तावित लोकसंख्या अंदाजानुसार २०३१ मध्ये ५५ लाख, २०४१ मध्ये ९५ लाख आणि २०५१ मध्ये १ कोटी ३५ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता असून त्यानुसार अनुक्रमे ९४९ एमएलडी, १,६३८ एमएलडी आणि २,३२८ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले.
गुरुवार, २ जुलै, २०२६
पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत __चेतन पवार
शेकडो शिवसैनिकांसह पवार यांची मातोश्री वर भेट
शहर पातळीवर संघटना अधिक सक्षम करून पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू __ चेतन पवार (शहराध्यक्ष, शिवसेने UBT)
| सांगावा न्यूज | मुंबई, दि. २ जुलै २०२६ : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला.



































