Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ११ जुलै, २०२६

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू


दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ११ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये आज चौथ्या दिवशी शोधमोहीमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना त्याच दिवशी सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. 

यादरम्यान ९ जुलै रोजी भावेश वाणी या नागरिकास इमारतीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र प्रवेश करण्याचा सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे या इमारतीच्या सभोवतालचा मलबा हटवण्यासाठी १२ पोकलेन, डंपर, जेसीबी मशीनचा वापर करून मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु दुर्घटनाग्रस्त इमारत धोकादायक व अस्थिर असल्याने इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्यास अडचणी आल्या. 

काल रात्री दुर्घटनाग्रस्त इमारतीचा  धोकादायक काँक्रिट भाग हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशिन घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या मशिनच्या सहाय्याने इमारतीचा अस्थिर भाग नियंत्रित पद्धतीने हटविण्यात आला. त्यानंतर इमारतीत प्रवेश करून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये दिवसभर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान पुढील व्यक्तींचे व्यक्ती आढळून आले त्यांची नावे : 
१.अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
२.सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
३ सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी) 
४.महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर)
५.नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी) ६.रणजीत पाटील (वय २२, मोशी) 
७.राहुल गायकवाड (वय ३५, मोशी) 
हे आज चौथ्या दिवशीच्या शोध मोहिमेत इमारतीमध्ये आढळून आले. त्यानंतर सर्वांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीअखेर मृत असल्याचे सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ८ इतकी झाली आहे.

तथापि, इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली अडकलेल्या एका नागरिकाचा अद्यापही युद्धपातळीवर शोध सुरू आहे. याकरिता एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून विविध यंत्रणांचा वापर करून अविरतपणे ही शोधमोहीम सुरू राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा