Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

’वैज्ञानिक दृष्टिकोन-युक्त शाळा’ ; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लक्षवेधी उपक्रम


चमत्काराचे अनेक प्रयोग सादर करीत त्यामागील हातचलाखी निदर्शनास आणून वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारा कार्यक्रम संपन्न 

| सांगावा न्यूज | शिरूर, पुणे. दिनांक ९ ऑगस्ट २०२६ : समाजाने दैनंदिन जीवनात वावरत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून चालले या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनोखा कार्यक्रम घेतला. दर वर्षी ९ ऑगस्ट हा महाराष्ट्र अंनिसचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. ९ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे विजयमाला विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये "वैज्ञानिक दृष्टिकोन-युक्त शाळा उपक्रम" हा घेण्यात आलेला उपक्रम लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र अंनिस तर्फे सुरू करण्यात आलेला सदर उपक्रम शैक्षणिक सत्र सन २०२६/२७ या वर्षी पुढील वर्षभर राबवण्यात येणार आहे. विद्यार्थी विद्यार्थीनी पालक आणि शिक्षकांमध्ये जाणीव जागृती करून वैज्ञानिक दृष्टिकोन कृतीत येण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र आणि देशामध्ये भोंदूगिरी आणि बुवाबाजीच्या जाळ्यात समाज अडकत चाललेला दिसतोय. या अंधश्रद्धेच्या जखडातून समाजाने स्वतः बाहेर आले पाहिजे. नाशिक येथे उजेडात आलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या शाळेच्या प्राचार्या मरिया साठे यांना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले. त्यातून त्यांनी महाराष्ट्र अंनिस चे ऍड. मनीषा महाजन व दिगंबर कट्यारे यांच्याशी संपर्क साधला. मरिया मॅडम, काही शिक्षक आणि महा. अंनिस सोबत ऑनलाइन  प्राथमिक चर्चा केली. १३ जून २०२६ रोजी दिगंबर कट्यारे, ऍड. मनीषा महाजन, उत्तम जोगदंड, संजू खलाने, पुणे शाखेच्या माधुरी गायकवड आणि रेणुका शिंदे यांनी शाळेस भेट देऊन शिक्षक आणि पालकांशी पहिला संवाद साधला. यावेळी असे ठरले की या उपक्रमाची सुरुवात शिक्षक प्रशिक्षणापासून करावी. काही अडचणींमुळे हे शिबीर लांबले आणि दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी ते घेण्याचे ठरले. त्यानुसार दिनांक ८ ऑगस्ट रोजी दिगंबर कट्यारे, मुंबईहून आलेले मच्छिंद्रनाथ मुंडे, सुशीला मुंडे आणि उत्तम जोगदंड हे या शिक्षक प्रशिक्षण शिबिरासाठी विजयमाला विद्या मंदिर शाळेत उपस्थित राहिले. शिबिरासाठी ३२ शिक्षकांनी उपस्थिती नोंदवली. सकाळी १०.३० वाजता शिबिराची सुरुवात झाली. शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. पाण्याचा दिवा मरिया मॅडम यांच्या हस्ते प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  उत्तम जोगदंड यांनी महाराष्ट्र अंनिस संघटनेचा परिचय करून देऊन संघटनेची पंचसूत्री, देव धर्म विषयक भूमिका, संघटनेचे कार्य, उपलब्धी याबाबत माहिती दिली. त्यानंतर सुशीला मुंडे यांनी महितीपूर्ण पीपीटीच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विस्तृत मांडणी केली. या मांडणीत मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी ‘चमत्कार’ प्रयोगाची पेरणी केल्याने हे सत्र केवळ महितीपूर्णच नाही तर रंजक देखील झाले. 

‘मन आणि मनाचे आजार’ हे पुढील सत्र मुंडे सरांनी घेतले. ओघवती शैली, अधून मधून विनोदांची फोडणी यामुळे हा कंटाळवाणा विषय देखील मुंडे सरांनी प्रभावी पद्धतीने सादर केला. पीपीटीचा वापर करून घेतलेल्या या सत्रात मनाचे विविध आजार, त्यांची इंग्रजी आणि मराठी नावे, त्या संबंधी घडलेली जीवंत उदाहरणे मुंडे सरांनी दिल्याने या विषयाचे आकलन शिक्षकांना चांगल्या प्रकारे झाले. दरम्यान सर्व शिक्षकांकडून एक प्रश्नावलि भरून घेण्यात आली.  यानंतर भोजन-अवकाश घेण्यात आला.

भोजन अवकाशानंतर दुसऱ्या सत्रात मुंडे सरांनी ‘चमत्काराचे’ अनेक प्रयोग सादर केले आणि त्यामागील विज्ञान, हातचलाखी कशी असते याची माहिती दिली. ते प्रयोग कसे करावेत याची माहितीही शिक्षकांना दिली.  त्यानंतर दिगंबर कट्यारे यांनी सण, उत्सव आणि पर्यावरण यावर पीपीटीच्या सहाय्याने सत्र घेतांना विविध धर्मातील सण, उत्सव यातून होणारे विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी या सण-उत्सवांना विरोध न करता विधायक पर्याय महाराष्ट्र अंनिसने कसे दिले आणि नंतर त्यातील काही पर्यायांचा स्वीकार सरकारने कसा केला याची माहिती दिली. तसेच ही शाळा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन-युक्त शाळा’ कशी करायची याची माहिती दिली. वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पांतर्गत स्वयं अध्ययन प्रश्नपत्रिकांचे वाटप शिक्षकांमध्ये करण्यात आले. 

विशेष म्हणजे शिक्षकांनी प्रत्यक्ष भेटून या प्रशिक्षणाचे मनापासून कौतुक केले. यावेळी बोलतांना कट्यारे सर म्हणाले की," मरिया मॅडम यांनी मनावर घेतल्याने हा उपक्रम आकारास आला आणि यामुळे अन्य शाळांमध्ये सुद्धा हा उपक्रम घेण्यासाठी संघटनेस बळ मिळाले आहे. हे शिबीर केवळ शिबिरार्थिंचाच नव्हे तर आम्हा प्रशिक्षकांचा देखील उत्साह वाढवणारे ठरले"

शेवटी आभार प्रदर्शन करतांना प्राचार्या मरिया मॅडम यांनी आणि शिक्षकांनी या शिबिरात खूप नवीन माहिती मिळाल्याचा, शिबीर अत्यंत उपयुक्त असल्याचा अभिप्राय देऊन महाराष्ट्र अंनिसचा विचार शाळेत रुजवायचा संकल्प केला. शिक्षकांकडून फीड-बॅक फॉर्म भरून घेण्यात आला. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. सर्वच शिक्षकांनी अगदी एकमुखाने या शिबिरास पूर्ण सकारात्मक फीड-बॅक दिला. अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्री कटारे सरांनी माध्यमांना दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा