Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ थेरगावचा अनुसाई विद्यालय पूनावाळे येथे मदतीचा हात


“तिरंग्याला सलामी देणे"  हा अभिमान; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे ही खरी राष्ट्रसेवा __अध्यक्ष रोटेरियन नरेंद्र बी. माने

| सांगावा न्यूज | पुनावळे, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ : गुरुकुल शिक्षण संस्थेअंतर्गत श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुनावळे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी Rotary Club of Thergaon चे अध्यक्ष रोटेरियन नरेंद्र बी. माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादभाऊ भागुजी ओव्हाळ, संस्था सचिव विश्वास ओव्हाळ, मुख्याध्यापक गणेश शिवाजी गवळी, ज्येष्ठ शिक्षक दीपक मारुती नेवाळे, योगेश एकनाथ ढावरे सर, रिझवाना सय्यद मॅडम व शिक्षकवृंदाने रोटरी क्लब ऑफ थेरगावच्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला पुनावळे परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, माजी विद्यार्थी, पालक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर्ण सादरीकरणाने उपस्थित भारावले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशप्रेम, संविधानिक मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांची कर्तव्ये यांचा संदेश देणारी प्रभावी भाषणे सादर केली. शिस्तबद्ध कवायत, देशभक्तीपर गीतांवरील नृत्य आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त, कलागुण आणि देशाप्रती असलेली भावना पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले. माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण, मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ थेरगावचे सेक्रेटरी रोटेरियन नितीन कुंजीर तसेच उपस्थित उद्योजक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि कठोर परिश्रमातून ती पूर्ण करण्याचा संदेश दिला.

“स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नाही; ती जबाबदारीही आहे” असे मात्र नरेंद्र माने यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना अध्यक्ष नरेंद्र माने पुढे म्हणाले की, “१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून आज आपण स्वतंत्र भारतात मुक्त श्वास घेत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर राष्ट्राप्रती असलेली जबाबदारीदेखील आहे.” भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल,  आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
“देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाने सैनिकच झाले पाहिजे असे नाही. एक चांगला डॉक्टर, शिक्षक, अभियंता, शास्त्रज्ञ, उद्योजक किंवा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक बनूनही आपण राष्ट्राची सेवा करू शकतो. शिक्षण घेऊ, स्वतः घडू आणि राष्ट्र घडवू — हाच आजच्या स्वातंत्र्यदिनाचा खरा संकल्प असला पाहिजे.”

२००२ पासून सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांसाठी शिक्षणाची दारे आपल्या पूनावळे परिसरात खुली झाली असून या विद्यालयाने २०२६ पर्यंतचा शैक्षणिक प्रवास जिद्द आणि सामाजिक बांधिलकीने सुरू ठेवला आहे. परिसरातील अनेक खासगी शाळांचे शिक्षण सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडणे कठीण होत असताना, अनुसाई ओव्हाळ विद्यालय माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. कष्टकरी, रिक्षाचालक, वाहनचालक, भाजीविक्रेते, सुरक्षा रक्षक, रोजंदारी कामगार आणि सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

“आर्थिक परिस्थिती ही कोणत्याही मुलाच्या शिक्षणातील अडथळा ठरता कामा नये. ज्या मुलांना शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचविणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी समाजातील सक्षम व्यक्ती, उद्योजक आणि सामाजिक संस्थांनी उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” 

रोटरी क्लबकडून तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा 

विद्यालयाच्या प्रत्यक्ष गरजा जाणून घेत Rotary Club of Thergaon २०२६–२७ तर्फे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली.

१. विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन
दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी क्लबचे सेक्रेटरी रोटेरियन नितीन कुंजीर यांच्या वतीने विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य, स्वच्छता आणि सन्मान या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

२. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी Study App
सप्टेंबर २०२६ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त Study App उपलब्ध करून देण्याचा मानस क्लबने व्यक्त केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करणे हा यामागील उद्देश आहे.

३. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहासाठी बांधकाम साहित्य
विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहाच्या कामाकरिता सिमेंट, वीट, वाळू, खडी, टॉयलेट पॉट व अन्य आवश्यक बांधकाम साहित्य रोटरी क्लब ऑफ थेरगावच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

“ही मदत एका दिवसापुरती मर्यादित राहणार नाही” रोटरी क्लबने यापूर्वीही विद्यालयाला सहकार्य केले असून ही सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“स्वातंत्र्यदिनाला तिरंग्याला सलामी देणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे; पण देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हीदेखील खरी राष्ट्रसेवा आहे. रोटरीची मदत केवळ आजच्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहणार नाही. विद्यालयाच्या प्रत्यक्ष गरजा समजून घेऊन त्यांच्या शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी Rotary Club of Thergaon कायम सोबत राहील.” अशी ग्वाही रोटेरियन नरेंद्र बी. माने, (अध्यक्ष) यांनी यावेळी दिली.

दानशूर नागरिक व उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन विद्यालय माफक फीमध्ये शिक्षण देत असल्याने पायाभूत सुविधा वाढविताना आर्थिक मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुनावळे, वाकड, थेरगाव आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व दानशूर नागरिकांनी विद्यालयाच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ थेरगावच्या वतीने करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष श्री माने यांनी एक मार्मिक संदेश दिला —
“मोठ्या इमारती उभारण्यापेक्षा मोठी माणसे घडविणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या डोळ्यांतील स्वप्नांना पैशांअभावी मर्यादा पडू नयेत. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाला किंवा एका शाळेच्या विकासाला हातभार लावला, तर आपण केवळ एका मुलाला मदत करत नाही तर एका कुटुंबाचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य घडवत असतो.”

कार्यक्रमाच्या शेवटी Rotary Club of Thergaon च्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व रोटरी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. उपस्थित रोटरी सदस्य रोटेरियन नरेंद्र बी. माने, मंगेश भोंडवे, विजय भुसारे, प्रमोद भोसे, गुड्डू राजपूत, प्रदीप काचाळे, डॉ. अभिजित सांगोळे, मोहन पांचाळ, दत्ताभाऊ कसाळे, राहुलजी शिंदे तसेच Rotary Club of Thergaon चे इतर सदस्य उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवर प्रल्हादभाऊ भागुजी ओव्हाळ (संस्थापक अध्यक्ष), विश्वास ओव्हाळ (संस्था सचिव), गणेश शिवाजी गवळी (मुख्याध्यापक), दीपक मारुती नेवाळे (ज्येष्ठ शिक्षक), योगेश एकनाथ ढावरे, रिझवाना सय्यद, केसकर मॅडम, गायधनी मॅडम, खैरनार सर, भालेराव मामा व अन्य शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. गुणवंत व विशेष उल्लेखनीय विद्यार्थी विवेकानंद अंधारे, गगन लोहार, विभा पारडे, अंकिता लोखंडे, वैष्णवी घोगरे, जान्हवी दडपे आदी विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा