Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

डी.पी. रोड, आणि रिंग रोडच्या हरकतींची एकत्रित सुनावणी घ्या ; थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाची मागणी

विकासाला विरोध नाही; मात्र नागरिकांच्या घरांचे संरक्षण करूनच विकास व्हावा__ नऊ हजार हरकतदार 

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या आगामी ३० वर्षांच्या नियोजनाच्या दृष्टीने महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नवीन प्रारूप विकास आराखड्यात थेरगाव परिसरातील जुन्या घरांवरून प्रस्तावित केलेल्या डी.पी. रोड तसेच एचसीएमटीआर रिंग रोडच्या आरक्षणामुळे बाधित नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. या प्रस्तावाविरोधात थेरगाव परिसरातून सुमारे ९ हजार हरकती दाखल झाल्या असून, या सर्व हरकतदारांची सुनावणी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी आणि सामूहिक पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाने आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात थेरगाव बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व प्रारूप विकास आराखडा समितीचे सदस्य श्री बारणे यांच्याकडे निवेदन करीत असतांना पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महापालिकेने १५ मे २०२५ रोजी शहराच्या पुढील ३० वर्षांच्या नियोजनाच्या दृष्टीने नवीन प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. या आराखड्यामध्ये थेरगाव येथील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या घरां व निवासी वस्त्यांवरून १२ मीटर, १५ मीटर व २४ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते, तसेच ३० मीटर रुंदीचा एचसीएमटीआर रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित रस्त्यांमुळे थेरगावमधील मोठ्या संख्येने जुनी घरे व मालमत्ता बाधित होण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीती, चिंता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधित नागरिकांनी वैयक्तिक तसेच थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या माध्यमातून विहित मुदतीत नगररचना विभागाकडे लेखी हरकती व सूचना दाखल केल्या आहेत.

दरम्यान, प्रारूप विकास आराखड्यातील विविध हरकती व सूचनांवर ३ ऑगस्ट २०२६ पासून सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर एचसीएमटीआर प्रकल्पासंदर्भात शासनस्तरावर निर्णय व मंजुरीची प्रक्रिया पुढे गेल्याने, प्रस्तावित डी.पी. रोड व एचसीएमटीआर रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये आपल्या घरांचे व मालमत्तेचे भवितव्य काय होणार, याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाने ३० जून २०२५ रोजी ‘थेरगाव बंद’ची हाक दिली होती. या आवाहनाला थेरगावमधील नागरिक, व्यापारी व विविध घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळला होता.

एकाच दिवशी सामूहिक सुनावणीची मागणी

थेरगावमधील डी.पी. रोड व एचसीएमटीआर रिंग रोडच्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या सर्व हरकती एकाच परिसरातील आणि परस्परांशी संबंधित असल्याने प्रत्येक हरकतदाराला वेगवेगळ्या दिवशी बोलावण्याऐवजी सर्व हरकतदारांची एकाच दिवशी, एकाच छताखाली सामूहिक सुनावणी घेण्यात यावी, अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे. सुनावणीची निश्चित तारीख व वेळ लेखी स्वरूपात कळविण्यात यावी. महापालिकेने निश्चित केलेल्या सुनावणीच्या ठिकाणी सर्व हरकतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह एकत्रितपणे उपस्थित राहावे, यासाठी संघामार्फत संबंधित नागरिकांना माहिती देण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांचे, मालमत्तेचे आणि त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याचे संरक्षण करूनच विकास व्हावा,” अशी भूमिका थेरगावमधील नागरिकांनी मांडली आहे.

डी.पी. रोड व एचसीएमटीआर रिंग रोडच्या आरक्षणामुळे हजारो कुटुंबांच्या घरांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांच्या हरकती गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाने व्यक्त करून निवेदन सादर केल्याची माहिती अध्यक्ष, अक्षय कांबळे यांनी प्रसार माध्यमांना दिली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा