थेरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर आपुलकी कॅन्सर हॉस्पिटलला भेट!
गरीब आणि गरजू कॅन्सरबाधित रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक ३ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलच्या नियोजनाला गती देण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी पुणे येथील ‘आपुलकी’ कॅन्सर हॉस्पिटलला आज भेट देत सविस्तर अभ्यास दौरा केला. सर्वसामान्य, गरीब व गरजू कॅन्सरबाधित रुग्णांना माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत थेरगाव येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील नियोजन, व्यवस्थापन आणि उपचार पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
अभ्यास दौऱ्यादरम्यान आमदार शंकर जगताप आणि अभिषेक बारणे यांनी हॉस्पिटलमधील विविध विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णसेवा, उपचार प्रणाली, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय व्यवस्था, आर्थिक नियोजन आणि हॉस्पिटलची एकूण कार्यपद्धती याबाबत सखोल माहिती घेतली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध बाबी जाणून घेतल्या.
या प्रसंगी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, “आपुलकी कॅन्सर हॉस्पिटलमधील कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची आणि तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीतून मिळालेली माहिती आणि अनुभव थेरगाव येथे उभारल्या जाणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.”
तर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “भविष्यातील नियोजन, सुविधा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती या भेटीतून मिळाली आहे.”
दरम्यान, थेरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलला पिंपरी-चिंचवड शहराचे लोकप्रिय लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील ठराव नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जनसेवेच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या नावाने उभारले जाणारे हे हॉस्पिटल भविष्यात हजारो कॅन्सरग्रस्त आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, थेरगाव येथील प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटलमुळे शहरासह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा