Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ३ जून, २०२६

खराबवाडी येथे अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांची कारवाई; १ लाख रुपयांहून अधिक किमतीचे ८१ गॅस टाक्या जप्त


खराबवाडी येथे अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांची कारवाई; १ लाख रुपयांहून अधिक किमतीचे ८१ गॅस टाक्या जप्त

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक ३ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत १ लाख ३०० रुपये किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई खेड तालुक्यातील खराबवाडी परिसरात करण्यात आली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार शहरातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू असून, त्याअंतर्गत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील खराबवाडी, चाकण-महाळुंगे रोड येथील ‘जय गणेश भारत गॅस’ दुकानात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून इतर सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी सचिन प्रकाश म्हसकरे (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस विशेष नोजलच्या सहाय्याने इतर सिलेंडरमध्ये भरून विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अशा प्रकारे गॅस रिफिलिंग करणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे आग, स्फोट किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. तरीही कोणतीही सुरक्षितता न बाळगता हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ८१ गॅस टाक्या जप्त केल्या असून त्यांची किंमत १,००,३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ भारतीय न्याय संहिता २८७, २८८ या कलमा सहा , जीवन आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलिस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम आणि गणेश हिंगे यांनी सहभाग घेतला.

-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा