पेशंट, नातेवाईक, उपस्थित सिक्युरिटी गार्ड सह सर्वांनाच घाणेरड्या शिव्या देत मद्यपि धिंगाणा घालून पसार; थेरगाव रुग्णालयातील गंभीर प्रकार
| सांगावा न्यूज | थेरगाव, दि. १ जून २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या थेरगाव येथील सुसज्ज हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स व ईतर स्टाफ गोरगरीब पेशंटची सेवा करीत आहेत. शहरातील आणि शहराबाहेरील रुग्णांना उपचार मोफत तसेच माफक दरात होत आहेत, त्यामुळे नागरिकांची सोय होत आहे. सुसज्ज नवीन थेरगाव रुग्णालय असे बिरूद मिरवताना काही थोड्या त्रुटी देखील आहेत. काही समस्या देखील आहेत त्या नाकारता येत नाहीत. त्या आपण समजून घेऊ शकतो. परंतु इथे आलेले पेशंट, नातेवाईक आणि उपस्थित स्टाफ सह सुरक्षा यंत्रणा यांना दिनांक ३१ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागला, तो म्हणजे एक मद्यपी पेशंटला भेटायला आल्यानंतर मोठ मोठ्याने पुरुषांच्या जनरल वॉर्ड मध्ये मोबाईलवर आई बहिणीवरून मोघम शिव्या देऊ लागला. ईतर पेशंट आणि नातेवाईकांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निमुटपणे हा त्रास सहन केला. साहजिकच पेशंट इथे बरा व्हायला आलेला असतो. नातेवाईक पेशंटच्या काळजीत असतात म्हणून सर्वांनीच त्या अनोळखी मद्यपिशी बोलण्याचे टाळले. पुरूष वर्डाच्या बाहेर आल्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि संपूर्ण हॉस्पिटलमध्ये दिसेल त्याला मग ते कुणीही असो महिला मुली पुरुष स्टाफ तसेच सुरक्षा रक्षक थेट प्रत्येकाला अश्लील शिव्या देत धिंगाणा घालत असभ्य वर्तन करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग करू लागला. या मद्यपिने रुग्णालयाची शांतता भंग केली. असा हा त्याचा धिंगाणा अर्धा तास रुग्णालयात चालू होता. आणखी थोडा वेळ थांबून राडा करीत राहिला असता तर एखाद्या पेशंटशी हुज्जत घालून काही अनुचित प्रकार घडला असता परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही. परंतु दुर्दैव असे की अशा मद्यपीने घाणेरड्या शिव्या देत घातलेला राडा आणि हतबल सिक्युरिटी मुळे हॉस्पिटल सुरक्षा यंत्रणेची निष्क्रियता नागरिकांच्या निदर्शनास आली आहे.
इथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेवटी त्याच्याच नातेवाईकाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित हॉस्पिटल स्टाफ, सुरक्षा रक्षक तसेच ईतर पेशंटच्या नातेवाईकांना शिव्यांची लाखोली झाडत विचित्र हावभाव करीत तो मद्यपी चालत राहिला. रुग्णालय इमारतीच्या लिफ्ट मधून खाली जात असताना सुद्धा तो गप्प राहिला नाही. नवीन थेरगाव रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली जात जात त्याच्या सोबतच्या नातेवाईकांशी हुज्जत घालत ग्राउंड फ्लोअर वरती लिफ्ट मधून बाहेर आला. पुन्हा दिसेल त्याला मग समोर आजूबाजूला महिला मुली पुरुष कोणीही दिसेल त्याला घाणेरड्या अशोभनीय अश्लील शिव्या देत बाहेर पडताना शेवटी गेटवरील सुरक्षा रक्षकांच्या आई माईंचे अशोभनीय शब्द सुमनांनी उद्धार करून हुज्जत घालू लागला. हे प्रकरण आता आपल्या अंगलट येईल याचा अंदाज घेऊन त्याच्या नातेवाईकांनी दुचाकीवर त्याला बसवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिक्युरिटी गार्डच्या अंगावर बोट करून पुन्हा अश्लिक शिव्या देतच राहिला. शेवटी नाईलाजाने त्याच्याच नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांना हात जोडून माफी मागितली. पण तो अनोळखी मद्यपी मात्र घाणेरड्या शिव्या देत देतच पसार झाला. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असेल तर रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे.
एखाद्या दारुड्याने असे रुग्णालयात येणे, राडा घालने, आणि असे विचित्र हावभाव करून अश्लील शिवीगाळ करुन सहज निघून जाणे हे कृत्य संबंधित हॉस्पिटल सुरक्षा यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. शेवटी सुरक्षा रक्षकांना देखिल घाणेरड्या शिव्या देत हुज्जत घातली तरीही एकाही वॉचमन, सिक्युरिटी, सुरक्षा यंत्रणेतील जबाबदार व्यक्तीने त्यांच्या वरिष्ठांशी संवाद साधून मार्ग काढला नाही किंवा स्वतः सबंधित अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार देण्याची हिम्मत केली नाही. यामुळे पेशंट आणि इथे सोबत आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांची सामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे असे निदर्शनास आले.
रविवारी रात्री घडलेला हा प्रकार पुन्हा घडू नये आणि काही अनुचित घटना घडू नये एवढीच सामान्य नागरिकांची अपेक्षा. नवीन थेरगाव हॉस्पिटल मध्ये घडलेल्या प्रकाराबाबाद पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून थेरगाव हॉस्पिटल प्रशासनाने काळजी घेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. जर पुन्हा असे घडले त्यातून काही हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हॉस्पिटल प्रशासन, आरोग्य अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा असेल.
मद्यपी कडून असभ्य वर्तनाची दुसरी घटना पुन्हा घडली!
आज दिनांक १ जून रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ३५ नंबर समोरील ब्लड व युरिन टेस्ट केबिन समोर देखील पुन्हा एका दुसऱ्या अनोळखी इसमाने हाती प्लास्टिक स्टूल घेऊन शिवीगाळ करीत असभ्य वर्तन करून रुग्णालयातील सार्वजनिक वातावरण दूषित केले. अशा पद्धतीने असभ्य वर्तन करुन सामाजिक शिष्टाचार आणि शांतता भंग करणारे प्रकार मद्यपींकडून सातत्याने घडत असतील तर हॉस्पिटल व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणा काय करते असा सवाल उपस्थीत झाला आहे.
"घडलेला प्रकार चुकीचा आहे. इथे सुरक्षा यंत्रणेचे दोन वेवगेवळे ठेकेदार आहेत. पेशंट आणि नातेवाईकांची सुरक्षा लक्षात घेता, रुग्णालयाची शांतता भंग होणार नाही याची काळजी घेऊन सुरक्षा रक्षकांनी वेळीच पुढे येऊन त्या राडेबाज मद्यपिला पकडून, बाहेर काढून त्याच्या विरुद्ध पोलिसात सुमोटो तक्रार दाखल करायला पाहिजे होती. असा प्रकार डोळ्यादेखत पाहत निमुटपणे निष्क्रीय राहणे म्हणजे सुरक्षा यंत्रणा ढिसाळ आहे, सुरक्षा यंत्रणेचे हे अपयश आहे"__ डॉ. सोनेकर (रुग्णालय प्रमुख; थेरगाव हॉस्पिटल)
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
_______________________________________
____

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा