| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३४ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एस एन बी पी विधी महाविद्यालयात “लिंगाचा पुनर्विचार: समानता, हक्क आणि सामाजिक न्याय” या विषयावर आयोजित कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. माहितीपूर्ण भाषणे, प्रेरणादायी विचार आणि उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष डॅा. डी. के. भोसले, प्रेसिडेंट वृशाली भोसले, ॲड डॅा.ऋतुजा भोसले, मा देवयानी भोसले संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांनी स्वागतपर भाषणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. कार्यक्रमाचे समन्वयक असिस्टंट प्रोफेसर प्रिया तोतले यांनी संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी मांडणी करत तो सुरळीत पार पाडला. यावेळी “महिला आणि बाल विकास व संशोधन प्रगत केंद्र” चे उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. मनीषा गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. मुख्य पाहुण्या डॉ. मनीषा गुप्ते यांचा परिचय असिस्टंट प्रोफेसर सयाली सातोनकर यांनी करून दिला, तर प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहा गोळे यांचा परिचय असिस्टंट प्रोफेसर नंदा माळी यांनी करून दिला. डॉ. स्नेहा गोळे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून आजच्या समाजातील लिंगसमतेचे महत्त्व अधोरेखित केले. “रूढी मोडल्याशिवाय समानता शक्य नाही,” असे सांगत त्यांनी शिक्षणातील समान संधी, विचारस्वातंत्र्य आणि समावेशकतेची गरज स्पष्ट केली. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना नवी दिशा दिली.
त्यानंतर डॉ. मनीषा गुप्ते यांनी “भेदभावमुक्तता आणि CEDAW फ्रेमवर्क” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला हक्कांचे स्वरूप, राज्याची जबाबदारी आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक उपाययोजना यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांना कायदेशीर व सामाजिक दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रवृत्त केले.
कार्यक्रमातील प्रश्नोत्तर सत्र हा एक आकर्षणबिंदू ठरला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत चर्चेत सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक जिवंत आणि संवादात्मक झाला.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. सोनल देशमुख, डॉ. सुनीता तपासे, अॅड. अर्पिता गोस्वामी, अभिराजी बहुलायन, कुशाग्र विक्रम, गजानन वाडूरकर, नीलिमा फोकमारे तसेच श्री. सुभाष राशीवाडेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. उज्वला भारती यांच्या मनोगतपूर्ण आभार प्रदर्शनाने झाला. एकूणच, हा कार्यक्रम केवळ महिला दिन साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, लिंगसमतेविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि विचारांना चालना देणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा