| सांगावा न्यूज | (प्रतिनिधी) लोहारा, दिनांक २५ : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील रवा हिप्परगा येथे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते आणि थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाची अज्ञात समाजकंटकांकडून स्मारकावर दारुच्या बाटल्या फोडून आणि येथे दगडधोंडे फेकून विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिनांक २४ मार्च रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असा आक्रोश ग्रामस्थांनी सोशल माध्यमांवरती व्यक्त केला आहे.
येथील गावकरी व पत्रकार सिद्धांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवा हिप्परगा येथील स्मृती उद्यानात स्वामीजींचे स्मारक आहे. नेहमीप्रमाणे नागरिक या परिसरात आले असता, त्यांना स्मारकावरी दगड धोंडे व देशी दारू च्या बाटल्या स्मारकावर फोडल्या असल्याने विटंबना झाल्याचे दिसून आले. सोशल माध्यमांवरून बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. संबंधित घटनेचा नागरिक सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप वरती निषेध व्यक्त करत असून ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याचा शोध घेवून दोषींवर कडक कारवाई करावी अशा भावना व्यक्त होत आहेत.
निजामशाही आणि रझाकारांच्या तावडीतून मराठवाडा मुक्तीसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्यांच्याच स्मारकाचा असा अपमान झाल्याने लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. हिप्परगा रवा गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या स्मारकाच्या जवळ उपाययोजना कराव्यात. तसेच परिसरात विनापरवाना असलेली दारूची दुकाने बंद करून ह्या अशा घडणाऱ्या घटनेला आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव जपण्यासाठी प्रशासनाने या स्मारकाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी आता जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा