Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, १ एप्रिल, २०२६

आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवडकरांची जाहीर माफी मागावी__मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)


आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवडकरांची 
जाहीर माफी मागावी__मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १ मार्च : गंधर्व महाविद्यालय आणि संतपीठ व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चुकीचे विधान केले आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले. "पिंपरी चिंचवड शहराची जगात काय ओळख?" अर्थात पिंपरी चिंचवड शहराला जागतिक पातळीवर कोण ओळखत? असे विधान आयुक्त साहेबांनी केल्यामुळे पिंपरी चिंचवड मधील रहिवाशांच्या भावना दुखावल्या. स्थानिक पत्रकारांच्या भावना दुखावल्या. नेते पुढारी मंडळींनी देखील आयुक्तांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा जाहीर निषेध केला. या परिस्थितीत युक्तांच्या बेसुमार वक्तव्याचा खुलासा करावा म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मागणी केली आहे की, आयुक्तांनी शहरवासीयांची जाहीर माफी मागावी.

यासंदर्भात मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड शहराची ओळख इतिहास आणि गौरवगाथा उदाहरणांसहित लेखी स्वरूपात सांगून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देत आयुक्तांनी माफी मागण्याची विनंती केली आहे.

"पिंपरी चिंचवड शहराला जगात कोण ओळखते? या आपल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल पिंपरी चिंचवड करांची आयुक्त साहेबांनी जाहीर माफी मागावी"

मारुती भापकर लिहितात, "पिंपरी चिंचवडला जगात कोणी ओळखत नाही, अशा आशयाचे बेताल आपण नुकतेच वक्तव्य केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.
पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तपदी पालक म्हणून आपण कार्यभार हाती घेतला असून या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांत आमच्या शहराबद्दल पूर्ण माहिती न घेता असे बेजबाबदार विधान करणे हे अजिबात जबाबदारीचे लक्षण नाही. त्यामुळे शहरातील पुढील महत्त्वाच्या बाबींचा आयुक्त म्हणून आपण अभ्यास करावा. 
१) महाराष्ट्रातच नव्हे, भारत देशातच नव्हे तर जगभरात वर्षानुवर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. गणपती बाप्पा "मोरया"ही घोषणा केली जाते. त्या मोरया गोसावी ची संजीवन समाधी या शहरात आहे. 
२) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे एकाच घरातील तीन चापेकर बंधू फासावर हे याच शहरातले आहेत.
३) छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे काळातील अनेक संदर्भ या शहराला आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे.
४) प्राचीन भारतात भोज राजाची नगरी भोजापूर तीच आजची भोसरी पिंपरी चिंचवड शहरात आहे.
५) पिंपरी चिंचवड शहराच्या उजव्या बाजूला कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी आहे.
६) पिंपरी चिंचवड शहराच्या डाव्या बाजूला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे देहुगाव आहे.
७) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना वेळेत औषध मिळाले नाही म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेऊन सन१९४९ला पिंपरी येथे एच.ए.कंपनीची स्थापना केली
८) कै. यशवंतरावजी चव्हाण व कै. अण्णासाहेब मगरांच्या दूरदृष्टीतून सन १९५० अल्फा लावल, सँडविक, एस के एफ या स्वीडिस कंपन्या, तसेच टेल्को, बजाज आदि वाहन निर्मितीचे कारखाने, ऑटोमोबाईल हब, आयटी हब तसेच सुमारे सात हजार पेक्षा अधिक लहान मोठे कारखाने महाराष्ट्रातील व देशातील, जगभरातील हाताला काम देणारी औद्योगिक नगरी म्हणून या शहराचा जगाला परिचय आहे
पिंपरी चिंचवड शहराला फार मोठा आणि देदीप्यमान असा इतिहास आहे. या शहरात अनेक राजवटी झाल्या आहेत. संत, साधू, क्रांतिकारक, उद्योजक, कामगार यांची ही पवित्र भूमी आहे. 
एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या महानगरपालिकेचे आयुक्तां म्हणून पिंपरी चिंचवड शहराला जगात कोणी ओळखत नाही, असे बेजबाबदारपणाचे विधान करणे, हे खरंच आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही. 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व गांधर्व महाविद्यालय यांची तुलनाच होऊ शकत नाही. तुलना ही दोन समान विषयाबाबत, गोष्टीबाबत होते, एवढेही भान आपल्यासारख्या आयुक्त पदावरील व्यक्तीला नसावे, हे अत्यंत खेदजनक आहे. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे चुकीचे विधान बोलल्यानंतर शहरात जागोजागी उद्रेक झाला; अनेकांनी त्यांच्या त्यांच्या परीने निषेध केला आहे; तरीदेखील आपण अद्यापपर्यंत दिलगिरी देखील व्यक्त केली नाही, याचे अत्यंत वाईट वाटते. आपले चुकले हे जर आपण मोकळेपणाने मान्य केले व तसे आपण जाहीरपणे केले, तर शहरवासीय नक्की समजून घेतील, याबद्दल आयुक्तांनी खात्री बाळगावी; कारण ही वारकऱ्यांची भूमी आहे. येथे ज्ञानोबा-तुकोबांचे निस्सीम भक्त या शहरात राहतात. त्यांचे मन विशाल आहे. म्हणूनच आपण चुकलो आहे, हे आपण जाहीरपणे कबूल करावे. झालेल्या चुकीबद्दल पिंपरी चिंचवड करांची जाहीर माफी मागावी, अशी विनंती माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्तांच्या ई मेल आयडीवर लेखी पत्र पाठवून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा