| सांगावा न्यूज | भूम , दिनांक १२ : भूम-पंढरपूर-कुर्डुवाडी-परंडा-भूम-वाशी-बीड-जालना-शेगाव हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी भूम येथे एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास वेगाने होईल. विशेषतः शिक्षण, उद्योग, व्यापार, तीर्थक्षेत्र, पर्यटन व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे यावेळी सर्वच वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी केले. त्यांनी या मार्गाची गरज आणि भौगोलिक तसेच सामाजिक फायदे उपस्थितांसमोर विषद केले. सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले.
यावेळी विविध पक्षांचे नेते आणि क्षेत्रीय मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत ही मागणी लवकरात लवकर केंद्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भगवान बांगर, रासपाचे गजानन सोलनकर, शिवसेनेचे अनिल शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिभीषण भैरट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष हनुमंत पाटूळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, काँग्रेसचे विलास शाळू, शिक्षक संजीवन खांडेकर,पत्रकार धनाजी शेटे, प्रा. सतिश मातने आणि भाजपचे भूम परंडा वाशी विधानसभाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या शेवटी रेल्वे संघर्ष समितीची रूपरेषा व उपस्थितांचे आभार संतोष वरळे यांनी मानले. या बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
1. नवीन रेल्वे मार्गासाठी विशेष समिती गठीत करण्याचे ठरले.
2. प्रत्येक पक्षाकडून चार प्रतिनिधींचा समावेश समितीत करण्यात येईल.
3. समितीत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधींनाही स्थान दिले जाईल.
4. समितीत अध्यक्ष वा सचिव नसून सर्वजण सदस्य असतील.
5. सात दिवसांच्या आत ही समिती अधिकृतरित्या गठीत करण्यात येईल.
6. एक ‘कोअर कमिटी’ देखील स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीत भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता. बैठकीत दाखवलेली एकता आणि सक्रियता पाहता, हा रेल्वे प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येण्यासाठी सक्षम पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा