योगेश यादवची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-१६ नवी मुंबई संघात तर आकाशवाणी यादवची अंडर-१४ हिंगोली जिल्हा क्रिकेट संघात निवड
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दि. १८ जून २०२ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील दोन विद्यार्थ्यांनी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी योगेश विलास यादव याची मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अंतर्गत अंडर-१६ नवी मुंबई जिल्हा संघात निवड झाली आहे. तसेच त्याची बहीण आणि विद्यालयातील विद्यार्थिनी आकाशवाणी यादव हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-१४ हिंगोली जिल्हा क्रिकेट संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे.
आकाशवाणी यादव हिची इयत्ता सहावीत असतानाच जिल्हास्तरीय क्रिकेट संघासाठी निवड झाली होती. सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने पुन्हा एकदा जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, योगेश यादव याने गोलंदाज म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्याने आतापर्यंत सुमारे ६० सामने खेळताना तब्बल १०९ बळी घेतले आहेत. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याची अंडर-१६ नवी मुंबई संघात निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे तसेच प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी त्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणेबद्दल बोलताना सांगितले की, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी त्यांना क्रिकेट सरावासाठी वेळोवेळी सहकार्य केले. स्पर्धांसाठी जाणे, सरावाचे नियोजन तसेच विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. शिक्षक आणि शाळेच्या पाठबळामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून या भाऊ-बहिणीने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यशाचे शिखर गाठले आहे. त्यांचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे. शालेय शिक्षण सांभाळत दोघेही दररोज शाळेनंतर सुमारे चार तास क्रिकेटचा सराव करतात. कठोर मेहनत आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर त्यांनी ही यशस्वी वाटचाल घडवून आणली आहे.
योगेश आणि आकाशवाणी हे दोघेही माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या यशामध्ये दिलीप वेंगसरकर तसेच अकादमीतील प्रशिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
"योगेश यादव आणि आकाशवाणी यादव यांनी क्रिकेट क्षेत्रात मिळवलेले यश हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्षमता, जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी जिल्हास्तरीय संघात स्थान मिळवले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा"
__रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
"महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. योगेश आणि आकाशवाणी यांनी अंडर-१६ आणि अंडर-१४ स्तरावर मिळवलेले यश हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे तसेच शिक्षक, पालक आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. भविष्यात ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास आहे"
__डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
"महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. योगेश आणि आकाशवाणी यांची निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि समर्पणाची पावती आहे. सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा"
__ममता शिंदे (उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा