Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त सवाल !


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २३ : अखंड देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचा अवमान करणारी निनावी पोस्टर्स राज्यभर झळकत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख करत त्यांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात पोस्टर्सवर दिसत आहेत. मात्र, या पोस्टर्स सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर, कचऱ्याच्या कुंड्यांच्या जवळ, गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणी तसेच रस्त्यालगत लावण्यात आल्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान झालेला आहे. या गंभीर प्रकरणी मुख्यमंत्री महोदय मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत, असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी उपस्थित केला आहे.

      सतीश काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सत्ता मिळवण्यासाठी छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन ‘चला देऊ मोदींना साथ’ अशी मोहिम छेडली. पण आता त्याच शिवछत्रपतींच्या प्रतिमांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ व सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर लावून अपमान केला जात आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे चिखल पाणी उडत आहे, अशा ठिकाणी महाराजांचे पोस्टर्स झळकत आहेत. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.” या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनमानसात तीव्र संताप आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते महाराष्ट्राची संस्कृती, अभिमान आणि अस्मिता आहेत. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही सन्मानाने केली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या प्रकाराने जनतेच्या भावना दुखावल्या असून, सामाजिक आणि राजकीय पातळीवर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

      दरम्यान, प्रसिद्धीच्या हव्यासापायी छत्रपतींचा असा अपमान का सहन करावा लागत आहे? तसेच जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथेही महाराजांचे पोस्टर लावून त्यांची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा प्रकार मुद्दाम घडवला गेला आहे का? "याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली भूमिका का जाहीर करीत नाहीत? असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित करीत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, मुख्यमंत्र्यांनी आपली तातडीने भूमिका जाहीर करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. छत्रपतींच्या प्रतिमांचा अवमान सहन केला जाणार नाही." येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव, सचिव नकुल भोईर , संघटक गणेश देवराम यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर