कचरा व्यवस्थापन, पुनर्विकास, स्वयंपुनर्विकास आणि क्लस्टर विकासासह विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांना दैनंदिन कामकाजातील विविध विषयांबाबत मार्गदर्शन मिळावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांच्या पुढाकाराने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम चिखली, पिंपरी-चिंचवड येथील टाऊन हॉलमध्ये सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत होणार असल्याची माहिती आज पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितली.
महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सहकारी सोसायट्यांसमोरील विविध प्रश्न, त्यावरील उपाययोजना आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती यांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयंपुनर्विकास या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन मार्गदर्शन करणार आहेत. पुनर्विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे, स्वयंपुनर्विकासाच्या संधी आणि सोसायटी पदाधिकारी व सभासदांसाठी उपयुक्त बाबींवर या मार्गदर्शनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
याशिवाय सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेअन्स, थकीत देखभाल शुल्काची वसुली, लिफ्ट व अग्निसुरक्षा व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), ओला कचरा प्रक्रिया यंत्रणा (OWC), सोसायटी पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, डिजिटल सोसायटीसाठी उपलब्ध पर्याय, सौर ऊर्जेचा वापर, सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व आणि सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसीय प्रदर्शनात विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहून सोसायटी पदाधिकारी व सभासदांच्या प्रश्नांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध शासकीय यंत्रणा आणि कॉर्पोरेट कंपन्यांची उत्पादने, सेवा व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी विविध दालने उभारण्यात येणार आहेत.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचा परिसरातील सहकारी सोसायटी पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा