कोणत्या व्हिडीओ ने राजकीय वातावरण पेटलं ?
![]() |
| तानाजी सावंत - प्रवीण रणबागुल - राहुल मोटे |
आमदार व्हायचंय भूम परांडा मतदार संघात ! मग पिंपरी चिंचवड मध्ये काय कनेक्शन ?
सांगावा न्युज, भूम. दि. १७ : धाराशिव जिल्ह्यातील भूम , परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यातील वातावरण ऐन थंडीच्या सुरुवातीला गरम झालं आहे. एवढं वातावरण का तापलं याचं कारण या बातमी यामध्ये कळणारच आहे. परंतु वातावरण तपण्याचे कारण समजून घेण्या आदी येथील मतदार संघातील राजकिय आखाड्यातील चित्र काय ते जाणून घेऊयात. यंदा २०२४ साठी भूम- परांडा - वाशी मतदार संघातून नवीन आमदार होण्यासाठी आखाड्यात तिरंगी लढत होणार आहे असे सध्या तरी वातावरण दिसत आहे. या तिरंगी लढतीतीत महायुतीचे उमेदवार असतील विद्यमान आमदार श्री तानाजी सावंत, महविकास आघाडीतून असतील माजी आमदार श्री रहुलभैय्या मोटे आणि वंचित बहुजन आघाडीतून प्रवीणदादा रनबागुल असतील असे चित्र आहे.
या तिन्ही तगड्या उमेदवारांची तिकिटे अजून अधिकृत पणे फायनल झाली नसली तरी त्यांचे सध्या जे काम चालू आहे ते जवळ जवळ आपापल्या पक्षातून तिकिटे फायनल झाल्यासारखेच आहे. आताच हाती आलेल्या माहिती नुसार प्रवीण रणबागुल यांचे तिकीट वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे . आता राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांच्या तिकिटांची केवळ औपचारिकता बाकी आहे. अलीकडे गेल्या काही दिवसात विद्यमान आमदारांनी मतदार संघात स्वखर्चाने शेती वस्तीवर, वाड्या वस्त्यांवर रस्ते करून देण्याचा सपाटा लावला आहे. दिवाळीच्या तोंडावर घरो घरी प्रत्येकी पाच किलो साखर वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे तर महिला भगिनींना साड्या वाटपाचे काम चालू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मध्येमावर फिरत आहेत. ही झाली विद्यमान आमदार श्री तानाजी सावंत साहेबांच्या बाबतीतील सुरू असलेली वातावरण निर्मिती. आता माजी आमदार गप्प थोडी बसतील ! त्यांनी देखील मतदार संघातील लोकांच्या भेटी गाठी घेवून- शेतकऱ्यांची आंदोलने- लोकांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग, लोकांचे प्रश्न समजावून घेणे आणि त्याला वाचा फोडणे सुरू केले आहे. एवढंच नाही तर तानाजी सावंतांनी गेल्या पाच वर्षात काय काय नाही केले त्यावर बोट ठेवून लोकांच्या आक्रोशाला वाव देत आहेत. त्यामुळे माजी आमदार श्री राहुलभैय्या मोटे यांनी तानाजी सावंतांच्या दुखत्या जागेवर घाव घालायला सुरुवात करून ते लोकांच्या समोर मांडायला सुरुवात केली आहे. विद्यमान आमदाराची खपलीने झाकून गेलेली दुखं, त्याच दुखावरच्या खपल्या काढायचे चोख काम माजी आमदार राहुल भैय्या मोटे करीत आहेत. मतदार संघात आमदार होण्यासाठी या दोन्ही प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारात दुरंगी लढत घासून होईल असे चित्र असतानाच यामध्ये तिरंगी लढत होणास कारणीभूत ठरणार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रवीणदादा रणबागुल . प्रवीणदादा रणबागुल यांनी देखील भूम- परांडा - वाशी मतदार संघातून फेरफटका मरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गवो गावी, खेडो पाडी , वाड्या वस्तीवर जावून वाजत गाजत गाव भेटीचे आयोजन चालू आहे. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप चालू आहे. तिन्ही तालुक्यात विविध जाती धर्माच्या लोकांना भेटत असून कार्यकर्ते व सामान्य लोकं वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत , यातून प्रवीण रणबागुल यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मतदार संघात आता नव्याने आमदार होण्यासाठी तिसरा उमेदवार दावेदार म्हणून प्रवीणदादा रणबागुल टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. परिणामी येथील आखाड्यात तिरंगी लढत होईल हे नक्की. ऐन थंडीच्या सुरुवातीलाच भूम- परांडा - वाशी मतदार संघातून वातावरण तापले असे चित्र असतानाच आता केवळ वातावरण गरम न राहता या राजकीय वातावरणाने पेट घेतला आहे असे म्हणता येईल.
आज सोशल मध्येमावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी मतदार संघातील लोकांची दिशाभूल केली. तलावातील पाणी हिंगणगाव , चांदनी, वाकडी व पंचकृशीतील शेतकऱ्यांसाठी सोडलं असं खोटं सांगून मागील पंचवार्षिक निवडणुकीत तानाजी सावंत आमदार झाले. परंतु पाणी मात्र सुरुवातीला फक्त दिखावा करण्यासाठी सोडलं त्यानंतर गेली पाच वर्षात कधीच पाणी आले नाही. उलट पाण्यासाठी खोदलेली कॅनॉल चारी बुजवली गेली. असं येथील स्थानिक शेतकरी प्रत्यक्ष स्पॉटवर उभे राहून सांगत होते. या गावकऱ्यांमध्ये सोबत उभे होते ते म्हणजे माजी आमदार रहुलभैय्या मोटे. मग काय वाऱ्यासारखा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मतदार संघातील वातावरण तापलं. प्रत्यक्ष कॅनॉल मधून न आलेल्या पाण्याने पेट घेतल्यासारखे इथे राजकारण पेट घेत आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आता यावर विद्यमान आमदार श्री तानाजी सावंत काय प्रतिक्रिया देतील याकडे मतदार संघातील लोकांचें लक्ष लागले आहे .
तसे पाहता मतदार संघात तिन्ही प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांची आपापली वोट बँक आहे. दलीत आणि मुस्लिम समाजासह स्नेह संबंधातील इतर समजतील मतदार आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद सद्या प्रवीण रणबागुल यांचेकडे आहे असे दिसत आहे. तर पारंपरिक दलीत आणि मुस्लिम मतदार आपल्याकडेच आहे ही खात्री मात्र राहुलभैय्या मोटे यांना असून जाती पाती पलीकडे जाऊन तरी शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे सकारात्मक चित्र राहुलभैय्या मोठे यांच्यासाठी तयार झाले आहे. तानाजी सावंतांनी अलीकडे झपाट्याने लावलेला कामाचा सपाटा असं चित्र उभ करतय की अजूनही मतदार विद्यमान आमदाराच्या सोबत आहे. तानाजी सावंतांचा तड की फड स्वभाव - लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांची भिड न राखता थेट आदेश देवून लोकांची कामे करून घेण्याची तानाजी सावंतांनी स्टाईल बहुसंख्य मतदारांना पटली आहे. त्यामुळे तानाजी सावंतांनी मतदार संघात चांगलीच पकड निर्माण केली आहे असेही चित्र पाहायला मिळत आहे.
भूम- परांडा - वाशी मतदार संघाचे पुणे - पिंपरी चिंचवड कनेक्शन :
नवीन पुणे समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात भूम,परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यातील लोकांचे वास्तव्य आहे. शिक्षण, नोकरी आणि उद्योग धंद्यासाठी आजही या शहरांकडे तालुक्यातील लोकांचे मयग्रेशन चालूच आहे. खऱ्या अर्थाने १९७२ सालच्या दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी या मतदार संघातील लोकांनी पुणे मुंबई गाठले . या मोठं मोठ्या शहरात हाताला काम आणि दाम मिळायला लागला. येथेच पोरं बाळं शिकली नोकरी धंद्याला लागली. या शहरांपैकी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने लोकं स्थायिक झाली. त्यामुळे येथील पाव्हणे रावळे - गावकी भावकी आणि ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्या मतदार संघातील नातेवाईकांना मतदानात परिवर्तन करण्यासाठी तिन्ही उमेदवारांनी आपापली सेटिंग लावल्याची माहिती आहे. त्यापैकी तानाजी सावंत आणि प्रवीण रणबागुल यांनी पिंपरी चिंचवड मध्ये मोठं मोठे मेळावे घेतले. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात, भूम- परांडा - वाशी मतदार संघातील जास्त लोकं असल्यामुळे भूम आणि परांडा डेपोच्या एस टी बसेस सकाळच्या वेळी जाताना आणि येताना देखील सकाळच्या वेळीच काही एस टी बसेस आहेत. पण रात्री फारच कमी बस आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड कडून गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी रात्री बस नव्हती. तानाजी सावंतांनी येथील लोकांना गावाकडे येण्यासाठी रात्रीच्या वेळी नवीन एस टी बस सुरू करीत असल्याचे जाहीर केले. अशा विविध घोषणा आणि मेळावे पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांनी अनुभवले. आता या मेळाव्याचा फायादा कितपत होईल ते लवकरच कळेल.
आता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाल्यानंतर २३ तारखेच्या निकाला दिवशीच कळेल की आपल्या भूम- परांडा - वाशी मतदार संघाचे नवीन आमदार कोण असणार ते ! तानाजी सावंत, राहुल मोटे, की प्रवीण रणबागुल ? मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला काय वाटतं ते आपलं म्हणणं कमेंट करून कळवा. वाचत रहा न्यूज पोर्टलवर बातम्या 'सांगावा न्युज' वर. पहात रहा बातम्या युट्यूब चॅनल ' सांगावा ' वर आणि विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी एक नजर नक्की टाका साप्ताहिक सांगावा न्युज वर.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा