| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १७ : तपन सिन्हा हे काळाच्या पुढे पाहणारे दिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे विषय निवडून चित्रपट केले ते आजही पुढचे चित्रपट वाटतात, असे मत बंगालमधील ज्येष्ठ समीक्षक स्वपन मलिक यांनी व्यक्त केले.
‘तपन सिन्हा आणि त्यांचे चित्रपट’ या विषयावर २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा( पीफ २०२५ )मध्ये आज चर्चा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ दिग्दर्शक गौतम घोष आणि स्वपन मलिक या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक सैबल चॅटर्जी उपस्थित होते.
स्वपन मलिक म्हणाले, की तपन सिन्हा हे ऋत्विक घटक, सत्यजित राय आणि मृणाल सेन यांच्यामुळे दुर्लक्षित झाले आहेत मात्र त्यांच्या चित्रपटांवरून अनेकांनी विविध भाषांमध्ये चित्रपट बनवले. सामान्य माणसांचे विषय घेऊन तपन सिन्हा यांनी मनोरंजन करणारे चित्रपट तयार केले. त्यांच्या चित्रपटांमध्ये मानवता हे मध्यवर्ती वैशिष्ट्य दिसते, तपन सिन्हा यांनी प्रामाणिकपणे मनोरंजन करणारे चित्रपट बनवले असले, तरी त्याला सामाजिक संदर्भ होते. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवले, तरी ते चित्रपट हे तपन सिन्हा यांचेच चित्रपट असायचे त्या कलाकारांचे नव्हे. त्यांनी मॅजिक रियलिझमचा वापर केलेला दिसतो.
ते म्हणाले, “तपन सिन्हा यांच्या जीवनामध्ये रवींद्रनाथ टागोर, साहित्य आणि मानवी जीवन या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या त्यांच्या चित्रपटांमधूनही दिसतात. ते स्वतःच्या निरीक्षणावरून त्यांच्या चित्रपटांच्या पटकथा स्वतःच लिहायचे. त्यांनी आर्ट आणि कॉमर्स यांची सीमारेषा धूसर करणारे त्यांचे चित्रपट तयार केले, जे खूप चालले.”
मलिक यांनी सिन्हा यांच्याविषयीच्या काही आठवणींही सांगितल्या. त्यांनी सांगितले, की सिन्हा लंडनमध्ये पाईनवूड स्टुडिओमध्ये चित्रपटाची कला शिकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी जगातील अनेक चित्रपट पाहिले. ते आणि सत्यजित राय हे एकमेकांशी संबंधित होते. त्यांच्या आदमी और औरत हा चित्रपट पाहून राय यांनी त्याची शिफारस बीबीसी चॅनेल ४ साठी केली होती. सिन्हा यांचा ‘काबुलीवाला’ हा चित्रपट पुण्यातही सलग ६ आठवडे चालला होता.
गौतम घोष बोलताना म्हणाले, की सिन्हा हे सेल्युलॉईडच्या काळातील दिग्दर्शक होते. ते नव्या तंत्रज्ञानाच्या काळात अस्वस्थ झाले होते. नवे दिग्दर्शक स्क्रीनवर पाहून चित्रपट कसे तयार करतात, त्यांनी त्यांनी कॅमेऱ्यात पाहायला हवे, असे त्यांचे मत होते. ते म्हणाले, “सिन्हा यांनी सगळ्या प्रकारचे चित्रपट तयार केले. त्यांनी आपले विषय बदलत ठेवले. त्यांनी असा कधी दावा केला नाही, की त्यांनी उत्तम सिनेमे तयार केले. ते म्हणायचे की ते शिकत आहेत. त्यांनी त्यांच्या आवडीचे विषय घेऊन चित्रपट केले, जे यशस्वी झाले.” घोष म्हणाले, की सिन्हा यांच्या चित्रपटांच्या निगेटिव्हज आता मिळत नाहीत, मात्र त्यांचे चित्रपट रिस्टोअर करणे गरजेचे आहे.
यावेळी क्षुधितो पाषाण, जातू ग्रीह, गाल्पो होल्यो शोत्ती, हार्मोनियम, सगीना महातू या सिन्हा यांच्या चित्रपटांच्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा