| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १९ : फक्त चित्रपट बनवायचा आहे म्हणून बनवू नका, तुमच्याकडे सांगण्यासारखे महत्त्वाचे आणि तथ्य असलेले काही असेल तरच चित्रपटाच्या वाटेल जा. त्यासाठी आधी जगा आणि अनुभव घ्या, असे मत पोर्तुगालच्या लेखिका आणि दिग्दर्शिका मार्गरिडा गिल यांनी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज दक्षिण भारतातील अभिनेत्री उर्वशी अर्चना, दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी, छायाचित्रकार जॉर्जीए स्टोजिल्कोविक, दिग्दर्शक मार्को बेकीस, लेखिका आणि दिग्दर्शिका मार्गरिडा गिल, फिनलंडचे दिग्दर्शक पेट्री कोटविका, श्रीलंकेचे दिग्दर्शक सुदत महादिवुलवेवा, इराणमधील दिग्दर्शिका तमिनेह मिलानी या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी संवाद साधला.
चिलीचे पटकथा लेखक दिग्दर्शक मार्को बेकीस म्हणाले, "दिग्दर्शकांनी स्वतःचा दृष्टिकोन ठरवावा. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची शैली तयार करावी. चित्रपट हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर भावना, वेदना आणि जीवनाचे प्रतिबिंब आहे."
“चित्रपट महोत्सव तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी खूप महत्वाचे आहे. महोत्सव शाळेसारखे आहेत. तुम्ही इतर देशांचे, जगभरातील चित्रपट पाहता आणि तुम्ही खूप काही शिकता. मी स्वतः महोत्सवांमधून खूप शिकले. या वर्षीच्या पिफ मध्ये वास्तवदर्शी आणि वेगळ्या दृष्टिकोनातून सादर केलेले चित्रपट पाहायला मिळाले. चित्रपट महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नसून तो संस्कृती, परंपरा आणि समाजातील बदल दाखवण्याचे माध्यम आहे”, असे मत उर्वशी अर्चना व्यक्त केले.
चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्या भविष्यासंदर्भात ज्युरींनी महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
"ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांची दृश्यस्वरूपातील आवड बदलली आहे. मात्र, चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव ओटीटीवर मिळू शकत नाही," असे पेट्री कोटविका यांनी स्पष्ट केले.
सुदत महादिवुलवेवा यांनी सांगितले की, "चित्रपटगृह ही एक परंपरा आहे जी कायम राहील. परंतु ओटीटीने निर्मात्यांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही माध्यमांना समतोल राखावा लागेल."
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक जाणीव जागृत करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, "चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते. दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना विचार करायला लावणारे विषय हाताळले पाहिजेत. विशेषतः लिंगभेद, सामाजिक अन्याय यासारख्या विषयांवर चित्रपट तयार करताना वास्तववादी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. केवळ संवेदनशील विषय हाताळणे पुरेसे नाही, तर तो प्रभावीपणे मांडणेही तितकेच महत्त्वाचे आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा