| सांगावा न्यूज | पिंपळे निलख, दिनांक 28 सप्टेंबर : पिंपळे निलख नगरातील पहिला शस्त्रपूजन उत्सव रविवारी (दि. २८ सप्टेंबर) चौंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशालनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. संध्याकाळी साडेपाच ते सात या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून श्री विकासजी शर्मा तर वक्ते म्हणून श्री विपिनजी मेनन उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे तरुण व्यवसायी प्रमुख श्री चंद्रशेखरजी पाठक यांनीही संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
शारीरिक कार्यक्रमांतर्गत घोषासह प्रदक्षिणा संचलन, व्यायामयोग, समता आणि दंडसंचालन यांची प्रभावी प्रात्यक्षिके झाली. नगर कार्यवाह धनंजय खोंड यांनी प्रास्ताविक करून नगराच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली. शाखांच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माण आणि शताब्दी वर्षातील उपक्रमांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत सेवा भारतीमार्फत सुरू असलेल्या मदतकार्याबद्दलही स्वयंसेवकांना माहिती देण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी विकासजी शर्मा यांनी “संघ म्हणजे देशासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे संघटन आहे,” असे सांगितले. तर विपिनजी मेनन यांनी हिंदू संस्कृतीतील शस्त्रपूजनाचे महत्त्व अधोरेखित करून संघ स्थापनेपासून शताब्दी वर्षापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी पंचपरिवर्तन उपक्रम आणि त्यातील स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट केली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा