| सांगावा न्यूज | पिंपळे सौदागर दि. ( प्रतिनिधी ) - हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेता धर्मेंद्र याला " पल पल दिल के पास तुम रहते हो " अशा भावपूर्ण गीताव्दारे श्रद्धांजली अर्पण करीत ज्येष्ठ नागरिकांनी " सूरमयी शाम " या मैफलीत सांस्कृतिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या करावके ग्रुपच्यावतीने पिंपळे सौदागर येथील कुंजीर क्रिडांगणाच्या परिसरात शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांच्या प्रतिसादात रंगत गेलेल्या या कार्यक्रमात समाजातील वास्तव प्रतिबिंबित करणारे " सुख के सब साथी दुख मे ना कोई " हे भक्तीगीत, तरल प्रेमाची साक्ष पटवून देणारे " दिवाना हुवा बादल..", " विरहाची आर्तता प्रगट करणारे " लंबी जुदाई ", निसर्ग आणि प्रेमाची सांगड घालणारे " आज मौसम है बडा ", निस्सीम प्रेमाची याचना करणारी गजल " होठो सें छु लो तुम मेरा गीत अमर कर दो " ही आणि इतर वैविध्यपूर्ण गाणी ज्येष्ठ नागरिक कलावंतांनी आपापल्या परीने सादर करण्याचा प्रयत्न केला. ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अशोक येळंमकर , सुरेखा पाटील, अनिल कुलकर्णी , अरविंद माने, बाळकृष्ण चौधरी, रेखा येळंमकर , सुरेश तांबोळी, करुणा नवले, प्रिया देवे, नंदा पवार, सुरेखा कुलकर्णी, उषा भागवत, राजेंद्र मांजरेकर, मंगला पाटील, शोभा गिरी आदिंनी गीतगायनात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकुंतला शिंदे यांनी केले. सखाराम ढाकणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला कासार, शोभा राजगुरे, भामिनी महाले, विमल मोंढेकर, सुभाष पाटील, जयपाल सिदनाळे, अशोक कलाल, सुभाष विधाते, विवेकानंद लिगाडे, रमेश चांडगे, अनिलकुमार शाह आदिंनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा