कष्टकऱ्यांचा मार्गदाता आपल्यातून निघून गेल्याने कामगार वर्गातर्फे दुःखी अंतःकरणाने "बाबांना" भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक ९ : कामगार कष्टकरी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली उभी हयात खर्ची करणारे ज्येष्ठ विचारवंत, समाज अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कामगार चळवळीची मुलुख मैदानी तोफ असे देखील बाबा आढाव यांना संबोधले जायचे. त्याचे कारण म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न आंदोलने उपोषणे मोर्चे काढून सोडविले. हातगाडी पंचायत, रिक्षा पंचायत, विविध कामगार आणि कष्टकरी संघटना, असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणारे बाबा आढाव अनंतात विलीन झाल्याने कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली असल्याचे बोलले जात आहे.
गोरगरीब, वंचित,असंघटित कामगार, हमाल, रिक्षा चालक-मालक, कामगार,शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत झुंजणारे झुंजार नेते, ज्यांच्या उत्तुंग कार्याकडे पाहुण, प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते घडले. असे ज्येष्ठ समाजसेवक,समाजवादी नेते, जन चळवळीचे पितामहा भीष्माचार्य, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे खरे वारसदार आदरणीय डॉ.बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बाबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद होता. आमच्या सर्व आंदोलनाला त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळायचा. त्या बळावर आम्ही लढत होतो. आमच्या मोहननगर मध्ये देखील त्यांचे मार्गदर्शन मिळाले.
खरोखर आज जनचळवळीचा आधारवड गेला. गोरगरीब वंचित शेतकरी कामगारांचा आवाज शिण झाला. या पुढच्या काळात त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबाला व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य पंढरीच्या परम दयाळू श्री पांडुरंगाने देवो, हीच प्रभू श्री पांडुरंग चरणी मनापासून प्रार्थना. ओम:शांती!शांती!शांती!"____ मारुती भापकर (सामाजिक कार्यकर्ते)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा