Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, १० जून, २०२६

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामे, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे विषय मंजूर


नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध असून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल." ___अभिषेक बारणे (स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. १० जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभेत शहराच्या सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधा बळकटीकरण, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते देखभाल तसेच सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या (टप्पा क्र. १) कामास मंजुरी देण्यात आली. संविधानातील लोकशाही, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी संविधान भवन महत्त्वपूर्ण ठरणार असून विविध शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वायसीएम रुग्णालयाकडील पाणीपुरवठा पंप चालविणे तसेच इमारतीमधील विद्युत व्यवस्थेची चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. 

 महापालिकेच्या विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी खरेदी करण्यात आलेल्या कॅनॉन कंपनीच्या प्रिंटरसाठी एक वर्ष कालावधीकरिता टोनर्सची दरकरारानुसार खरेदी, तसेच महानगरपालिकेच्या मराठी माध्यम बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शिक्षणांतर्गत लेखन साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने नवीन भोसरी रुग्णालय व यमुनानगर रुग्णालयाच्या इमारतीतील कॉरिडॉर, अंतर्गत व बाह्य परिसर, रस्ते, पार्किंग, उद्यान क्षेत्र, डक्ट व ड्रेनेज लाईनची दैनंदिन साफसफाई, तसेच नवीन थेरगाव रुग्णालयातील कोविड-१९ आपत्कालीन कालावधीत सीएसआर निधीतून प्राप्त ९ व्हेंटिलेटर व ३ मोबाईल एक्स-रे मशीनच्या देखभाल-दुरुस्ती करारास मंजुरी देण्यात आली. याशिवाय वैद्यकीय विभागाकडील १७ व्हेंटिलेटर्सची सीएमसी करण्यास आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आवश्यकतेनुसार विविध पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर भरण्यास मान्यता देण्यात आली. 

महापालिका कार्यक्षेत्रातील मुस्लिम (३), ख्रिश्चन (१) व लिंगायत (१) दफनभूमी परिसरांची २४ तास देखभाल, स्वच्छता, सुरक्षा व आवश्यक प्रशासकीय कामांसाठी काळजीवाहकांची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी थेरगाव, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधी नगर, शांतीनगर या झोपडपट्टी भागांतील जलनिस्सारण नलिकांची देखभाल व दुरुस्ती, तसेच ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जलनिस्सारण विभागाने खोदलेल्या चरांची दुरुस्ती करून रस्ते पूर्ववत करणे, चेंबर दुरुस्ती व समपातळीकरणाची कामे मंजूर करण्यात आली.

यासोबतच प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ मधील ड्रेनेज वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करणे, तसेच पिंपरी व रहाटणी परिसरातील जलनिस्सारण नलिका टाकण्यासाठी खोदलेल्या चरांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करण्याची कामे मंजूर करण्यात आली. शहरातील वाढत्या लोकवस्तीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती, शेलार वस्ती, रामदास नगर, पाटीलनगर आदी भागांमध्ये, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील रूपीनगर, गणेशनगर, तळवडे व इतर भागांमध्ये आवश्यकतेनुसार जलनिस्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करून नवीन नलिका टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक २० मधील संत तुकाराम नगर व इतर परिसरांमध्ये, प्रभाग क्रमांक २८ मधील पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरात, तसेच प्रभाग क्रमांक ३२ मधील जुनी सांगवी येथील मुळानगर व इतर भागांमध्ये जलनिस्सारण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा व नवीन नलिका टाकण्याची कामे मंजूर करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीआरटीएस कॉरिडॉर क्र. १ मधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची साफसफाई, पुणे-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरील रेलिंगविषयक कामे, तसेच पुणे-आळंदी रस्त्यावरील रोड फर्निचर पेंटिंग व स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत नाशिक फाटा ते मोशी (एनएच-६०) महामार्गावरील महापालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती, प्रजिमा-३१ रस्त्याची देखभाल-दुरुस्ती व अनुषंगिक स्थापत्य कामे, भक्तीशक्ती चौक ते मुकाई चौक रस्त्यावरील किरकोळ स्थापत्य दुरुस्तीची कामे, तसेच एमडीआर-३१ रस्त्यावरील केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याची देखभाल-दुरुस्ती व संबंधित कामे मंजूर करण्यात आली. पाणी व सांडपाणी व्यवस्थापनासाठी दापोडी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे चालन व देखभाल-दुरुस्ती, तसेच रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणाकडे जाणाऱ्या १८ मीटर डी.पी. रस्त्यावरील सबवेच्या स्थापत्य विषयक कामांना मान्यता देण्यात आली. स्वच्छता आणि जनजागृती उपक्रमांतर्गत महाराष्ट्र स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यास, तसेच नवी दिशा प्रकल्पांतर्गत प्रभाग क्रमांक ३०, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प चालविण्यास देण्यास मंजुरी देण्यात आली.

सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी २८६ किलोवॅट नवीन उच्चदाब वीजपुरवठा घेण्यास, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील संत तुकाराम नगर व गणेशनगर येथील महापालिकेच्या स्ट्रीट लाईटसाठी नवीन वीज मीटर घेण्यासह इतर विविध विभागातील कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली.

"पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणारे तसेच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला बळकटी देणारे विविध महत्त्वाचे विषय आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले आहेत. संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याचा निर्णय हा शहराच्या वैचारिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासोबतच जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध असून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल." ___अभिषेक बारणे (स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा