नगरसेवक सुरेश भोईर यांचा स्तुत्य उपक्रम; नागरिकांसाठी १५० स्टॉल्स मोफत उपलब्ध, स्थानिक उद्योजक व महिला बचतगटांना हक्काचे व्यासपीठ
| सांगावा न्यूज | चिंचवड, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच स्थानिक व्यावसायिक, महिला उद्योजिका आणि लघुउद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली योगदान प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथे भव्य दिवाळी प्रदर्शन व खरेदी-विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभागातील नागरिकांना आपले उत्पादन विक्रीसाठी तब्बल १५० स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नगरसेवक सुरेश भोईर हे गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने अशा प्रकारचे दिवाळी प्रदर्शन आयोजित करून स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना आणि महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळत आहे.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार माननीय उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, माजी महापौर अपर्णाताई डोके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, कामगार नेते अंबर चिंचवडे, हेमंत डांगे, रवींद्र प्रभुणे, दीपालीताई कलापुरे, सोनाताई गडदे, रेखाताई जाजू, मिनाक्षीताई इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रदर्शनामध्ये दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू, आकर्षक आकाशकंदील, विविध प्रकारचे दिवे, फराळाचे पदार्थ, कपडे, इमिटेशन ज्वेलरी अशा विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. याशिवाय महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले वडापाव, थालीपीठ, पाणीपुरी, भेळ, केक, विविध घरगुती खाद्यपदार्थ आणि नावीन्यपूर्ण पदार्थांचे स्टॉल्स नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी तसेच त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत दिवाळी खरेदीसाठी पिंपरी किंवा इतर गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाऊन वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आपल्या परिसरातच सर्व प्रकारच्या दिवाळी साहित्याची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रदर्शन सोयीचे ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'लोकल फॉर व्होकल' या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देणारा हा उपक्रम ठरत आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांच्या कलागुणांना वाव देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा या प्रदर्शनामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
हे प्रदर्शन एकूण तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. केवळ दिवाळी खरेदीपुरते मर्यादित न राहता स्थानिक कलाकार, महिला उद्योजिका आणि छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम चिंचवड परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
स्थानिकांना व्यवसायाची संधी आणि नागरिकांना परिसरातच दिवाळी खरेदीची सुविधा देणारा नगरसेवक सुरेश भोईर यांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजाभिमुख आणि लोकहिताचा ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा