इंदिराच्या विद्यार्थ्यांना ४.१५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मंत्री आठवले यांच्या हस्ते प्रदान
"आठवले यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन"
| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक २९ : गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरा विद्यापीठाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय भरीव आणि मोलाचे आहे. त्यामुळेच दुबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी इंदिरा विद्यापीठाची शिफारस करणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता. २९) ताथवडे येथे केले.
इंदिरा विद्यापीठाच्या ओपनिंग हॉरीझोन्स ह्या थीमवर आधारित ऍडमिशन पर्वाचे व एसइओ-ऑप्टिमाइज्ड वेबसाइटचे लाँचिंग तसेच ४१५ विद्यार्थ्यांना ४.१५ कोटी रुपयांच्या स्कॉलरशिपचे वितरण मंत्री आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यक्तिमत्व विकासापासून विकसित भारतापर्यंत: संवैधानिक मूल्यांचे महत्त्व" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर, शैक्षणिक सल्लागार व मुख्य विपणन अधिकारी प्रो. चेतन वाकलकर, कुलगुरू डॉ. अनघा जोशी, डॉ. पुनम भोयर, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी गिरीश पारेख, कार्यकारी संचालक शार्दुल गांगल, विश्वस्त साहिल तरिता शंकर, रजिस्ट्रार डॉ. प्रवीण पाटील, सर्व प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आठवले पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी साकारलेली राज्यघटना जगातील सर्वात मोठी आणि मजबूत घटना असून ती मोदी सरकार बदलणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी मी संसदेत ठामपणे उभा असल्याचे सांगत
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना भारत चौथ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेऊन लवकर आर्थिक महासत्ता बनेल असे भाकीत केले.
इंग्रजीत कवितांचे पंच अन हास्यांचा फवारा
एरवी कवितांचे पंच मारून खळखळून हसवणाऱ्या मंत्री आठवले यांनी सुरुवातीलाच चक्क इंग्रजी यमक जुळवून आज इंग्रजीत भाषणाचा इरादा असल्याचे संकेत देत तब्बल एक तास इंग्रजीत मार्गदर्शन केले. चौफेर फटकेबाजी करून हास्याचे कारंजे फुलविले. ते म्हणाले, शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र असून केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही. ते समाजातील असमानता दूर करण्याचे शक्तिशाली शस्त्र आहे. बाबासाहेबांच्या आदर्शानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला सक्षम करून घेत समाजाला दिशा द्यावी.
सात प्रकारातील ४१५ विद्यार्थ्यांना शिक्षवृत्ती
इंदिरा विद्यापीठाने गुणवत्तेवर आधारित, विद्यार्थिनींसाठी डॉ. तरिता शंकर शिष्यवृत्ती, आर्थिक दुर्बल घटकांसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी, खेळाडूंसाठी, शहीदांच्या वारसांसाठी, पूरग्रस्तांसाठी अशा सात प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरु केल्या शनिवारी तब्बल ४.१५ करोड रुपयांच्या शिष्यवृत्तीपैकी राजलक्ष्मी मोटे, उपेंद्र मुळे, अभिषेक माने, शिवप्रसाद बारस्कर, श्रीकर पांचाळ, रितेश लाटे यांना प्राथमिक स्वरूपात मंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा