राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि जाहीर विरोध
पक्षश्रेष्ठींनी आम्हाला विश्वासात घेऊन आमच्यावरील अन्याय टाळावा__ भाजपा पदाधिकारी(पिंपरी चिंचवड)
भाजपचे निष्ठावंत म्हणताहेत, अपप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊन पक्ष प्रतिमा व पक्षाच्या परंपरेला गालबोट लावून देऊ नका!
| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाकड भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून माजी नगरसेवक राहुल कलाटे व इतर नेत्यांच्या प्रस्तावित भाजप पक्षप्रवेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गुरुवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत पक्षश्रेष्ठींनी आम्हाला विश्वासात घेत अपप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊन भाजपच्या परंपरा व प्रतिमेला गालबोट लावू नये, अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष चेतन भुजबळ, महिला मोर्च्याच्या प्रदेश पदाधिकारी प्रा. भारती विनोदे, श्रीनिवास कलाटे, नवनाथ ढवळे, अमोल कलाटे, प्रसाद कस्पटे, सुदेश राजे, तेजस्विनी ढोमसे, अश्विन पंडित, रेश्मा साळेकर, राहुल काटे, रावसाहेब डोंगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून आयाराम गयारामांना प्राथमिकता देणं अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल कलाटे यांचा इतिहास व राजकिय पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या सोयीनुसार अनेक पक्षांची वारी केली असून ते आतापर्यंत कोणाशीही एकनिष्ठ राहिले नाहीत. स्वार्थासाठी मलीन प्रतिमा असलेल्या या नेत्याला गत निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. स्थायी समिती सभेत या अपप्रवृत्ती व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीने एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे. त्यामुळे आमचा अशा प्रवृत्तीला विरोध आहे. अशा व्यक्तीच्या पक्षप्रवेशाने पक्षाच्या प्रतिमेला देखील धक्का बसणार आहे. भाजपचे नेते विशाल अप्पा कलाटे म्हणाले, "वाकड भागातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला पूर्णपणे विरोध आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या अंतर्गत एकजुटीला व प्रतिमेला धक्का बसू शकतो. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या यशावर परिणाम होऊ शकतो. आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमची भूमिका स्पष्टपणे सांगणार आहोत. वाकड भागातील स्थानिक समस्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि कलाटे यांच्या प्रवेशाच्या संभाव्य परिणामांवर भूमिका मांडत पक्षाच्या एकतेसाठी आणि निवडणुकीच्या यशासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भाजपचे पदाधिकारी या परिषदेतून पक्षाच्या वरिष्ठांना आवाहन करत म्हणाले की, स्थानिक नेत्यांच्या मताचा विचार करून निर्णय घ्यावा, जेणेकरून पक्ष संघटना आणि शहरात पक्षाची ताकद मजबूत राहील आणि महापालिका निवडणुकीत सहज विजय मिळवता येईल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा