| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक १५ : रावेत येथील Arise International School या खाजगी शाळेविरुद्ध फी वाढ व पुस्तक-गणवेश खरेदीची सक्ती केल्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत या शाळेविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार नोटिसा देण्यात आल्या. तसेच ३ जुलै २०२५ रोजी सुनावणी घेऊन शाळेला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांनी गणवेश, शूज व पुस्तके खरेदीस सक्ती करू नये, दरवर्षी पुस्तकांची प्रकाशने बदलू नयेत, ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या नावाखाली घेतलेली फी पालकांना परत करावी तसेच फी वाढीबाबत संपूर्ण तपशील कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन शाळेकडून आजपर्यंत करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. उलट शाळेने शिक्षक-पालक संघाची मान्यता न घेता सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या सलग तीन शैक्षणिक वर्षांत फी वाढ केल्याचे सादर केलेल्या तक्त्यातून स्पष्ट झाले आहे.यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन झाल्याचा ठपका शाळेवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी जाणूनबुजून दिरंगाई केल्याचा आरोप होत आहे. वारंवार तक्रारी, नोटिसा आणि सुनावणी होऊनही शाळेविरुद्ध ठोस कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हित धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित शाळेचा युडायस क्रमांक गोठविण्याची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण अधिकारी संगीता बांगर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा