Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, १० मार्च, २०२६

चिंचवड, दिनांक १० : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील महत्वाच्या घडामोडींपैकी टॉप १० बातम्या.

 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १० : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील महत्वाच्या घडामोडींपैकी टॉप १० बातम्या

१. बाबुरावजी घोलप महाविद्यालयात दोन दिवसीय लेखन कौशल्ये कार्यशाळा उत्साहात संपन्न 

'सर्जनशील लेखन आणि अर्थ निर्णयन' व कादंबरी साहित्यप्रकारातील लेखन कौशल्याचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी ,पुणे. मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयात "विविध साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत २० फेब्रुवारी रोजी प्रा.डॉ. नवनाथ तुपे यांचे 'सर्जनशील लेखन आणि अर्थ निर्णयन 'आणि प्रा. सुशील  धसकटे यांचे' कादंबरी साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

२. महिला दिनानिमित्त महिलांकडून धुळमुक्त पिंपरी-चिंचवडची मागणी

जागतिक महिला दिनानिमित्त लोकहीतवादी सेवा संघाच्या वतीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येबाबत आवाज उठवत शहर धुळमुक्त करण्याची मागणी केली.

संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे आणि सचिव - विशालभाई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे तर उपाध्यक्षा रेखा काटे होत्या. तसेच साध्वी निंबाळकर, अतिश दुधावडे, ऋषिकेश वाघमारे आणि अनिता चोपडे यांचेही विशेष सहकार्य लाभले.

३. नियमांचे उल्लंघन करून एका मुलाने भरधाव टेम्पो चालवून काळेवाडी फाटा परिसरातील चार ते पाच गाड्यांना धडका मारल्या! काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

आठ मार्च सकाळी दहा च्या सुमारास काळेवाडी फाटा येथे सिग्नलवर ४०७ टेम्पो  वरील चालक जिवन तानाजी यादव याकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसताना आणि तो लहान आहे हे माहीत असुन देखील  लोकांच्या जिवीतास धोका होईल याची कल्पना असताना देखील भरधाव टेम्पो चालविल्यामुळे काळेवाडी फाटा परिसरात विविध वाहनांना धडका देऊन अपघात घडला. त्यामुळे याला टेम्पो चालवायला देणाऱ्या प्रौढ व्यक्तीला जबाबदार धरून अटक केले आहे. सदर ४०७ टेम्पो  भरधाव वेगात रस्त्याचे नियम व परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवित असताना एका हिरो स्लेण्डर  मोटार सायकल सह इतर वाहने ज्यामध्ये होंडा सिटी कार, एक रिक्षा , एक स्विफ्ट कार,  एक हुंदाई आय १० कार, , होंडा शाईन मोटर सायकल एवढ्या वाहनांना धडक दिली. यामध्ये फिर्यादी व रिक्षा चालक, होंडा शाईन चालक यांना जखमी केले. फिर्यादी व इतर लोकांच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला व सर्व गाड्यांच्या नुकसानीस कारणीभुत झाल्यामुळे एक महिला आरोपी, एक विधी संघर्षात बालक आणि एक अठरा वर्षाच्या आतील चालक आरोपी आहेत. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक श्री पोटे करीत आहेत.

४. शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम' सुरू

चौदा वर्षांच्या मुलींसाठी सर्व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवीन सांगवी रुग्णालयात सदर मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २४ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

५. प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत छंद जोपासावेत – उपमहापौर शर्मिला बाबर

विविध कार्यक्रमांद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या धकाधकीत अनेकदा महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, मात्र निरोगी शरीर आणि सकारात्मक मन असेल तरच त्या कुटुंब, समाज आणि कार्यस्थळी अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या दैनंदिन दिनक्रमात आरोग्याची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळू शकेल, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. 

६. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा; महापौर रवि लांडगे यांच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना              

महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठकांचे सत्र सुरु; आज त्यांनी घेतला अ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा सविस्तर आढावा

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करणे, कचरा संकलन, नालेसफाई तसेच रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय वाढवून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या.

७. अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा शाळा बंद करण्याचे आदेश महापालिका शिक्षण विभागाने काढली नोटीस.

माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, सुजाता फाउंडेशन प्रगती हार्मोनी मोशी, डी एम के इंटरनॅशनल स्कूल कासारवाडी या शाळेच्या मान्यता बंद करण्याचे आदेश

काही नियमांचे उल्लंघन करून शाळा अनधिकृत चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने शहरातील तीन खाजगी शाळांच्या मान्यता बंद करण्याच्या नोटीस काढून आदेश दिले आहेत. यामध्ये माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, सुजाता फाउंडेशन प्रगती हार्मोनी मोशी, डी एम के इंटरनॅशनल स्कूल कासारवाडी या शाळांचा समावेश आहे. संबंधित शिक्षण विभागाने यापुर्वी आपले शाळेस भेट देवून तपासणी केली असता, शासन मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा सुरु असल्याचे आढळून आल्याने  शाळा बंद करणेबाबत निर्देश देण्यात आले होते. तरीदेखील शासन मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरु ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करित आहेत. सदरची बाव ही गभीर स्वरुपाची असून त्यामध्ये  शासनाची, शिक्षण विभागाची व पालकांची फसवणुक केल्याचे स्पष्ट होत आहे. तरी हे पत्र मिळालेपासून १० दिवसांचे आत सबंधित शाळेने आपली शाळा बद करावी. आपण शाळा बंद न केल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम मधील तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय  तरतुदीनुसार अनाधिकृतपणे शाळा चालवून विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्या प्रकरणी शाळा सुरु असलेल्या प्रत्येक दिवसाकरिता दहा हजार रुपये दंड व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश नोटीसद्वारे देण्यात आले आहेत.

८. रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलचा यू डायस नंबर बंद करण्याची नोटीस 

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळा शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून पालकांकडून वेगवेगळ्या कारणासाठी भरमसाठ अनधिकृत फी वसूल करीत असल्याच्या अनेक पालकांच्या आणि पालक संघटनाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. अनेक तक्रारी येऊन देखील आणि सबंधित शाळांना नोटीस पाठवून खुलासे मागवून देखील अनुधिकृत फी वसूल करण्याचे सत्र थांबता थांबत नाही. अनधिकृत फी वसूल करण्यामध्ये रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलने कहर केला आहे. अनधिकृतपणे डिजिटल प्लॅटफॉर्म फी, सिलॅबस पुस्तके खरेदी, स्पोर्ट फी, वार्षिक स्नेहसंमेलन फी आणि असे अनेक इतर कारणे सांगून विद्यार्थी व पालकांकडून पैसे उकळले जात आहे. शिवाय पालकांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीच्या तुकड्या चालवण्यासाठी परवानगी नसतांना देखील अधिकृत वर्ग तुकड्या चालवल्या जात आहेत. शेवटी पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाने आज रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलचा यू डायस नंबर बंद करायचे आदेश काढले आहेत. गेली वर्षभरापासून पालक आणि पालक संघटना वारंवार या शाळेविरुद्ध तक्रार देत असून आजपर्यंत कारवाई होत नव्हती. संबंधित शिक्षण विभाग आणि अधिकारी कर्जचारी वेळकाढूपणा करीत होते. अनेक वेळा केवळ नोटीस आणि खुलासा पत्र लिहून शिक्षण विभाग अधिकारी आणि कर्मचारी दिखाऊपणा करीत होते. खडक कारवाई करीत नव्हते. आता देखील यू डायस तात्पुरता बंद करण्याचे आदेश म्हणजे या पळवाटा आहेत. यामध्ये शाळा व्यवस्थापन आणि महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे संगनमत असल्याचा संशय पालकवर्ग व्यक्त करीत आहेत 

९. शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा घेतला आढावा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासोबतच त्यांचे संगोपन, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण यासाठी ठोस उपाययोजना करा. पिंपरी चिंचवड शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

१०. नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे

शहर सुधारणा समितीच्या बैठकीत आरोग्य, झोपडपट्टी, पर्यावरण, स्वच्छता आदी विषयांचा सविस्तर आढावा

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा