यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश प्रदान
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ११ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती”ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश आज प्रदान करण्यात आला. हा धनादेश महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती श्री. अभिषेक बारणे, विधी समिती सदस्य कुशाग्र कदम तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या औद्योगिक, सहकारी आणि विकासात्मक धोरणांद्वारे आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसारखी छोटी गावे देशातील अग्रगण्य औद्योगिक शहरांमध्ये विकसित झाली. लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा जतन करण्यासाठी स्थापन झालेली “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती” गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
निगडी प्राधिकरण परिसरातील भव्य स्मारकात ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, सांस्कृतिक भवन, वैद्यकीय केंद्र आणि विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून हजारो विद्यार्थी, नागरिक आणि अभ्यासक लाभ घेत असून समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “स्व. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा ही केवळ इतिहास नसून महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणाशक्ती आहे. शिक्षण, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि युवकांच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महापालिका नेहमीच पाठबळ देईल. हे अनुदान म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून समाज घडविणाऱ्या कार्याला दिलेला सन्मान आहे.”
या अनुदानामुळे संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून नागरिकाभिमुख कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास बळ प्राप्त होणार आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. सुनील जाधव, उपाध्यक्ष श्री. संजय ढेंबरे, उपाध्यक्ष श्री. अमोल भोईटे, सचिव श्री. रामभाऊ तावरे, खजिनदार श्री. विलास भोसले, सहखजिनदार श्री. अशोक चव्हाण तसेच श्री. रामचंद्र सकुंडे उपस्थित होते.
---------------------------------*--------------------------------
{विनय सोनवणे : संपादक, सांगावा न्यूज |MJMC|
मास्टर ऑफ जर्नालिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन}
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
---------------------------------*--------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा