१६४ काेटींची टप्या-टप्याने हाेणार समायाेजन
आगाऊ भरलेली रक्कम मालमत्ता करात समायोजित केली जाणार आहे ___अभिषेक बारणे (अध्यक्ष, स्थायी समिती ; पिंपरी चिंचवड महापालिका )
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १० जून २०२६ : शहरातील २०२३ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत ९६ काेटी १२ लाख रूपयांचे समायाेजन केले आहे. २०२६-२७ या वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचेही मालमत्ता करामध्ये समायाेजन करण्यास बुधवारी (दि.१०) स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना २०१२-१३ पासून शास्तीकर वसूल केला जात हाेता. ३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मार्च २०२३ पूर्वी झालेल्या २५ हजार ६७३ अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ता धारकांनी शास्तीकराची २६० काेटी ५३ लाख रूपयांची रक्कम महापालिकेकडे जमा केली हाेती.
शास्ती कर माफीचा निर्णय झाल्यानंतर २०२३-२४ मध्ये २२ हजार ५१२ मालमत्ता धारकांना ३० काेटी ३ लाख, २०२४-२५ मध्ये २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांना ३५ काेटी ९५ लाख, २०२५-२६ मध्ये २१ हजार ८२४ मालमत्ता धारकांना ३० काेटी १४ लाख असे ९६ काेटी १२ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित केली. त्यानंतरही २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांची १६४ काेटी ४१ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित करणे बाकी आहे. त्यानुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षात १६४ काेटी ४१ लाखांपैकी जेवढी शक्य आहे, त्यानुसार ती रक्कम समायाेजित केली जाणार आहे. या समायाेजनाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
"शहरातील २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरून मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला हाेता. राज्य सरकारने २०२३ मध्ये शास्तीकर माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम २०२३-२४ पासून त्यांच्या मालमत्ता करातून समायाेजित केली जात आहे. आतापर्यंत २६० काेटी ५३ लाखापैकी ९६ काेटी १२ लाख रूपये समायाेजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांनी कर भरू नये. त्यांची आगाऊ भरलेली रक्कम मालमत्ता करात समायोजित केली जाणार आहे" ___अभिषेक बारणे (अध्यक्ष, स्थायी समिती. पिंपरी चिंचवड महापालिका)
"अनधिकृत बांधकाम धारकांच्या बिलामध्ये शास्ती कराचे समायाेजन केले जात आहे. ही रक्कम माेठी असल्यामुळे एका वर्षात समायाेजन हाेऊ शकत नाही. दरवर्षी मालमत्ता धारकांच्या बिलानुसार समायाेजन केले जात आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचे समायाेजन केले जाणार आहे. महापालिकेकडे १६४ काेटी ४१ लाख रूपये समायाेजन करणे बाकी आहे. ही रक्कम टप्या-टप्याने दरवर्षी समायाेजित केली जात आहे" ___तृप्ती सांडभोर (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा