मोशी कचरा दुर्घटनेवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी!
प्रशासनावर टीकेची झोड; तर काही नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. १५ जुलै २०२६ : पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कचरा संकलन (डेपो)नाही तर अत्याधुनिक पद्धतीचे व दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रियाकेंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आज महापालिका सभेत मोशी येथील एकाच ठिकाणी संकलन (डेपो) व प्रक्रिया केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरात कचरा डेपो नाही तर आधुनिक स्वरूपातील प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे, असे स्पष्ट केले.
दरन्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा मुद्दा चांगलाच गाजला. ९ कर्मचाऱ्यांचा असा दुदैवी अंत होणे ही प्रशासनाची अनास्था आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी तीव्र टीका केली, तर सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे समर्थन करत त्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडल्याची भूमिका मांडली.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी ही दुर्घटना मानवनिर्मित असल्याचे सांगत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सडकून टीका केली. योग्य नियोजन आणि प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप त्यांनी सभागृहात केला.
दुसरीकडे, नगरसेवक राहुल कलाटे तसेच सत्तारूढ पक्षनेते शत्रुघ्न काटे यांनी रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान केलेल्या महापालिका आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले. दुर्घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ यंत्रणा कामाला लावून बचावकार्य राबविले असून, आयुक्तांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या विषयावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. विविध नगरसेवकांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी प्रशासनाच्या प्रयत्नांचे समर्थन केले.
दरम्यान, सभागृहातील सर्व पक्षांच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी मोशी कचरा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जखमी नागरिकांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना व्यक्त करत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा