Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका

इंद्रायणी नदीची पूजा करायची आणि त्याच नदीत अशुद्ध सांडपाणी सोडायचे, ही दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही ; एसटीपीला विरोध करणाऱ्या कोणत्याही संघटना, महासंघ किंवा गटाला ठाम विरोध __सत्यव्रत त्रिपाठी

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक ३ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना (PCCHSS) ने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) संदर्भात आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्य असून, एसटीपी स्थापनेला विरोध करणाऱ्या कोणत्याही संघटना, महासंघ किंवा गटाच्या भूमिकेला पीसीसीएचएसएसचा ठाम विरोध आहे. संघटनेने स्पष्ट केले की, त्यांचा विरोध एसटीपीला नसून, सोसायटीचा ताबा देण्यापूर्वी कार्यक्षम एसटीपी उभारण्याची कायदेशीर जबाबदारी टाळणाऱ्या बिल्डर्सना आहे. पात्र गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पूर्णपणे कार्यरत एसटीपी उभारणे, त्याची चाचणी घेणे आणि कार्यान्वित करूनच सोसायटीचा ताबा देणे ही बिल्डरची कायदेशीर जबाबदारी आहे. कार्यरत एसटीपीशिवाय कोणतेही पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) किंवा भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) देऊ नये, अशी संघटनेची ठाम मागणी आहे.

यावेळी संघटनेने "पीसीएमसीच्या चांगल्या कामात सोबत, चुकीच्या कामात विरुद्ध!” हे आपले ब्रीदवाक्यही पुन्हा अधोरेखित केले संघटनेचे सचिव प्रकाश जुंकटवार म्हणाले, “पर्यावरण संरक्षणाची सुरुवात सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनापासून होते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्या आणि जलस्रोतांसाठी गंभीर धोका आहे. कार्यक्षम एसटीपी ही केवळ कायदेशीर अट नसून भविष्यातील पिढ्यांप्रती आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक बिल्डरने सोसायटीचा ताबा देण्यापूर्वी कार्यरत एसटीपी उभारणे बंधनकारक केले पाहिजे.” याचबरोबर, पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन केले आहे की, बिल्डरने कार्यरत एसटीपी उभारून दिल्यानंतर तो नियमितपणे सुरू ठेवणे, त्याची योग्य देखभाल करणे आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासन, महानगरपालिका किंवा बिल्डर्सचीच जबाबदारी नसून प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीचीही तितकीच नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. कार्यरत एसटीपी बंद ठेवणे किंवा त्याची योग्य देखभाल न करणे हे पर्यावरणाप्रती निष्काळजीपणाचे लक्षण आहे. सर्व सोसायट्यांनी पर्यावरणाच्या हितासाठी एसटीपी नियमितपणे कार्यरत ठेवावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने पर्यावरण संरक्षण, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि बिल्डर्सची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरणाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाला संघटना पूर्ण पाठिंबा देईल, तर पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृती किंवा भूमिकेला ठाम विरोध करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

"आम्ही निसर्गमातेच्या बाजूने आहोत. इंद्रायणी नदीची पूजा करायची आणि त्याच नदीत अशुद्ध सांडपाणी सोडायचे, ही दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही. एसटीपीला विरोध करणारी कोणतीही संघटना पर्यावरणाच्या विरोधात उभी राहत आहे आणि अशा भूमिकेला पीसीसीएचएसएस कधीही समर्थन देणार नाही. बिल्डरांनी कार्यक्षम एसटीपी उभारल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये.” __सत्यव्रत त्रिपाठी, (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा