Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

एससी उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग बांधवांचा पिंपरी-चिंचवडमध्ये एल्गार


मांगांचा पक्षच नाही, त्यामुळे आपल्याला कुणी विचारीत नाही : प्रा. सुकुमार कांबळे

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ : अनुसूचित जातीतील (एससी) उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत एल्गार करण्यात आला. मंगळावर दिनांक १७ रोजी चिंचवड येथील लहुजी वस्ताद साळवे स्मारक ते निगडी तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सर्व अनुसूचित जातीतील घटकांना समान संधी मिळावी, यासाठी एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण होणे आवश्यक असल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली. मातंग समाजासह अनुसूचित जातीतील विविध घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व व संधी मिळावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चानंतर झालेल्या सभेत प्रा. सुकुमार कांबळे यांनी मातंग समाजाच्या राजकीय उपेक्षेवर भाष्य करत आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “ब्राह्मणांचा पक्ष आहे, मराठ्यांचा पक्ष आहे, धनगरांचा, महारांचा पक्ष असल्यामुळे ते सत्तेत आहेत. आपलं मांगांचं काय आहे? आपल्यामुळे कुणी निवडून आलो म्हणत नाही, आपल्यामुळे कुणी पडलोही म्हणत नाही. आपला कुणालाच काही फरक पडत नाही. म्हणून आपली कुठेच गणती होत नाही.”

विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनीही एससी उपवर्गीकरणाची भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण होणे गरजेचे आहे. एससीमधील प्रत्येक घटकाला संधी मिळाली पाहिजे, म्हणून उपवर्गीकरण होणे गरजेचे आहे.”

मातंग समाजाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शहर तसेच ग्रामीण भागातून हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले. लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा निगडी तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. या मार्गावर उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ घोषणा देत समाजबांधवांनी आपली एकजूट दाखवून दिली.

निगडी तहसील कार्यालयाजवळ मोर्चाची सांगता झाल्यानंतर आयोजित सभेत प्रा. सुकुमार कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपापली भूमिका मांडली. अनुसूचित जातीतील उपेक्षित घटकांना न्याय्य वाटा मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा