‘Soft Skills: Success Companion’ ठरतेय विद्यार्थ्यांसाठी यशाचा सोबती
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, पुणे दिनांक १७ ऑगस्ट २०२६ : प्राध्यापक राहुल समिंदर लिखित सॉफ्ट स्किल सक्सेस कंपॅनियन पुस्तक प्रकाशन सोहळा पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाला. मंगळावर दिनांक १७ रोजी झालेल्या प्रकाशन सोहळ्या वेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी आणि डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे उपस्थित होते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक किंवा तांत्रिक कौशल्ये पुरेशी नसून व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवाद, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन आणि नेतृत्वगुण यांसारख्या सॉफ्ट स्किल्सचीही आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन प्रा. राहुल समिंदर यांनी लिहिलेले ‘Soft Skills: Success Companion (यशाचा सोबती)’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल असा विश्वास लेखक प्रा. समिंदर सरांनी यावेळी व्यक्त केला.
या पुस्तकात प्रेरणा, ध्येय निश्चिती, आत्मसन्मान, सकारात्मक विचार, वेळेचे व्यवस्थापन, सर्जनशील व चिकित्सक विचार, समस्या सोडविण्याचे कौशल्य, संघबांधणी आणि नेतृत्वगुण यांसारख्या महत्त्वपूर्ण सॉफ्ट स्किल्सचे सोप्या व मुद्देसूद पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीतील संभाव्य प्रश्न, प्रभावी उत्तरे, जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्ग आणि व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
बॅचलर डिग्री घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी परीक्षेच्या दृष्टीनेही हे पुस्तक विशेष उपयुक्त असून धड्यानुसार शॉर्ट नोट्स, पाठाचा सारांश, महत्त्वाचे व अतिरिक्त प्रश्न, मागील वर्षांतील प्रश्न, परीक्षेचे स्वरूप, पाठांतराच्या ट्रिक्स तसेच इंग्रजी-मराठी शब्दार्थ यांचा समावेश आहे. इंग्रजीतील संकल्पना मराठीत सोप्या भाषेत स्पष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजून घेणे सुलभ होते.
सीनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले असले, तरी त्यातील कौशल्यांचा उपयोग शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, व्यावसायिक, नोकरदार तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही होऊ शकतो. त्यामुळे हे पुस्तक केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणारे मार्गदर्शक ठरते.
‘Success Companion – यशाचा सोबती’ या नावाला सार्थ ठरवत हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त व्यक्त केली. महावीर जाधव (पत्रकार) संभाजी बारबोले (गीतकार/अभिनेते), राहुल जाधव (अभिनेता), ज्ञानेश म्हस्के (कवी), श्री कुचेकर (अभिनेता), अमर चाकोटकर (सिनेमॅटोग्राफर/अभिनेता), प्रशांत पाटोळे (आर्ट दिग्दर्शक) इत्यादी मान्यवरांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सिने कलाकार यांच्या उपस्थितीत ‘Soft Skills: Success Companion’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा