लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काल दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजेच आता मराठी भाषा ही क्लासिकल लँग्वेज म्हणून सिद्ध झाली तसा दर्जा आपल्या मराठी भाषेला लाभला. मराठी भाषेचं विजय असो.
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात. मराठी भाषा ही कशी अभिजात भाषा सिद्ध झाली. मराठी भाषेचे ऐतिहासिक संदर्भ. आत्तापर्यंत किती भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि आता मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय किंवा त्याचा फायदा काय यासंदर्भात सविस्तर आपण जाणून घेऊयात .
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात हे पाहायचे झाले तर...
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवलेले आहेत. ते जाणून घेऊयात.
१. देशातील एखादी भाषा अभिजात ठरण्या साठी ती भाषा प्राचीन असली पाहिजे आणि त्या भाषेतील साहित्य हे श्रेष्ठतम असले पाहिजे
२. अशी भाषा जी सतित्वत आहे त्या भाषेचे अस्तित्व हे दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे आणि त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असले पाहिजे
३. भाषा प्राचीन तर असावीच शिवाय त्या प्राचीन भाषेचा गाभा हा आधुनिकतेची कायम असावा.
मराठी भाषा ही कशी अभिजात भाषा सिद्ध झाली तेही जाणून घेऊयात.
आपल्या मराठी भाषेला वेगवेगळ्या भागात वेगवेगळा लहेजा आहे. बावन्न बोली भाषेपाच्या लाहेजपासून आपली मराठी भाषा सजलेली आहे असेही मानले जाते. मराठीची महती राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी त्यांच्या त्यांच्या ग्रंथांमधून शब्दबध्द केलेली आहेच. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही आत्तापर्यंतची वेगवेगळी राज्य सरकारे प्रयत्नशील होती .
अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित व्यवस्थेत समज होता, पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. त्यामुळे तो समाज खोदून काढण्यास मदत झाली. मराठीचं वय आठशे वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न श्री पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या प्रयत्नांना यश मिळविले आहे.
गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, असे सिद्ध होते. मराठी ही प्राचीन भाषा तर आहेच शिवाय त्यातील साहित्य हे श्रेष्ठ आहे. म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी सातत्याने मागणी होत होती.
मराठीचे पुरावे बाराव्या आणि तेराव्या शतकापासून पाहायला मिळतात. त्यासाठी ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ या ग्रंथांचा संदर्भ उपयोगी पडतो. मराठीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रीपर्यंत जाऊन भिडते.
प्राचीन महारठ्ठी - महरठ्ठी - मराठी प्राकृत - महाराष्ट्रीय - मराठी : असा हा आपल्या मराठी भाषेच्या नावाचा उगम ते आजपर्यंतच्या मराठी पर्यंत प्रवास आहे.
आपली मराठी भाषा ही मराठी आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर मराठीला अभिजात दर्जा मिळवा म्हणून सातत्याने प्रयत्न होत होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा समिती १० जानेवारी २०१२ रोजी स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करण्यासाठी आणि सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी ही समियाती स्थापन करण्यात आली होती. तसा अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले. प्रा. पठारे यांच्यासह प्रा. हरी नरके व अन्य काही सदस्य या समितीत होते. या समितीने केलेले काम महत्त्वाचे आहे. समितीने केलेला अभ्यास व मराठी भाषाविषयक संशोधन सिद्ध करण्याची समितीची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. आपला भारत देश हा बहुभाषिक राष्ट्र आहे. भारताची विविधता लक्षात घेण्यासाठी भाषांचे वैविध्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. केंद्र शासनाने ठरविलेल्या काही निकषांमध्ये शिलालेख अथवा कोरीव लेख ही अस्सल संशोधन साधने महत्त्वाची आहेत. लेण्याद्रीजवळचा असलेले शिलालेखही मराठी भाषेसंदर्भात स्पष्ट पुरावा म्हणून ठळक आढळतो. हे सर्व बघितले की, मराठी भाषेचे प्राचीनत्व व मौखिक साहित्याची निरंतर तसेच सततची परंपरा आढळून येते. दोन हजार वर्षे जुनी असणारी ही मराठी भाषेची परंपरा आहे. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारचे निकष मराठी भाषा पूर्ण करते हे या विवेचनावरूनही स्पष्ट होते. असे हे मराठी भाषेचे ऐतेहासिक संदर्भ लक्षात घेता मराठी भाषेचे वैभव आणि उपलब्धता सिद्ध होते. गेली अनेक वर्षांपासून सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांची संस्था संघटनांची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ते धेय्य आणि स्वप्न आज पूर्ण झाले असे म्हणता येईल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते. ते आज फळाला येवून ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.
आता जाणून घेवूयात आत्तापर्यंत आपल्या भारत देशात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, पाली, प्राकृत, उडिया , आसामी आणि मराठी अशा अकरा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला म्हणजे आता नेमाक पुढं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना ?
याचं उत्तर म्हणजे आता आपली मराठी भाषाने प्राचीन असल्याचे सिद्ध केले.
आपल्या मराठीला एक उत्तम भाषेचा दर्जा प्राप्त झाला.
भारतासह जगभरात मराठीला क्लासिकल किंवा अभिजात भाषा म्हणून एक दर्जा मिळाला
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आपल्या महाराष्ट्र राज्याला भरीव अनुदान मिळेल. साहजिकच मराठी भाषेच्या वैविध्य आणि मराठी भाषेच्या विकासाच्या टप्प्यांवर कार्य करतांना जे जे लोकं प्रवाहात येतील त्यांनाही रोजगार आणि मराठी साठी कार्य केल्याचे समाधान मिळेल.
जगभरातील अभ्यासकांना, इतिहासकाराना , भाषा तज्ज्ञांना मराठी भाषेत संशोधनात्मक कार्य करण्यास संधी निर्माण होईल.
दरवर्षी मराठी अभ्यासकांना संशोधकांना आणि मराठी भाषेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या दोन व्यक्तींना सन्मानाचे पुरस्कार मिळतील.
एकंदरीत मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठीची कॉलर अभिमानाने टाईट झाली अशी म्हणता येयील.
( शब्दांकन - विनय सोनवणे )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा