| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक १३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य किसन उर्फ माऊली भोसले यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची सदिच्छा भेट घेतली. अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन केले. भेटीदरम्यान शहरातील पथविक्रेत्यांवर होत असलेल्या अन्यायकारक अतिक्रमण कारवाईचा मुद्दा उपस्थित करून माहिती दिली.
भोसले यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांमध्ये पथविक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण कारवाई केली जात असून त्यामुळे हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. कायद्याचे संरक्षण असतानाही पथविक्रेत्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून स्थायी समिती सभापतींकडे व्यथा मांडली.
तसेच शहरात खाजगी ठेकेदारांमार्फत करण्यात आलेल्या बोगस सर्वेक्षणाबाबतही आक्षेप नोंदवला. या सर्वेक्षणामुळे अनेक पात्र पथविक्रेते वंचित राहिल्याचा अंदाज व्यक्त केला.
शहरातील विविध भागांमध्ये हॉकर्स झोन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत पथविक्रेता समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे असून समितीच्या मताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडली.
सदिच्छा भेटीवेळी पुष्पगुच्छ देण्याऐवजी “मनोहरी विचार” हे पुस्तक भेट देत अभिषेक बारणे यांचा सन्मान किसन उर्फ माऊली भोसले यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा