| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १६ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अडीच वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना काळेवाडी परिसरात घडली असून आरोपीने मुलीच्या ओळखीचा फायदा घेत हा फळ खाण्याचे आमिष दाखवून अमानुष प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर पीडित मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी संबंधित काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय भोसले या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही होत असताना पालकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा