Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित विकासकामांना 'स्थायी'ची मंजुरी


| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. 

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व प्रशासनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेषतः झोपडपट्टी व दाट वस्ती भागांमध्ये गटर करणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे, शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी व मनपा इमारतींची देखभाल यांसारखी कामे ह, अ, ब, क, ड, इ, फ व ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सिद्धार्थनगर, गुलाबनगर, जयभीमनगर, महात्मा फुलेनगर, भारतमातानगर, राजीव गांधीनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, इंदियानगर, काळभोरनगर, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर आदी परिसरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत.

शहरातील रस्ते व वाहतूक सुधारण्यासाठी निगडी-दापोडी रस्त्यावरील बसस्थानक व डेडिकेटेड लेन दुरुस्ती, सांगवी-किवळे रस्त्याचे डांबरीकरण, निगडी टिळक चौक ते दुर्गानगर रस्त्यावरील कामे, तसेच प्रभाग क्र.२ मधील चिखली महादेवनगर, रोकडेवस्ती, मोशी व जाधववाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स व बीबीएम पद्धतीने डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१६ मधील रावेत, वाल्हेकरवाडी व किवळे येथील रस्त्यांची दुरुस्ती, प्रभाग क्र.२४ मधील सदाशिव कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, आनंद पार्क परिसरातील रस्ते कॉंक्रीटीकरण, तसेच प्रभाग क्र.२५ मधील वाकड, पुनावळे, ताथवडे भागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वेनुनगर, कावेरीनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकणे, तसेच फूटपाथ व पेव्हिंग ब्लॉक दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.

वाहतूक व नागरी नियोजनाच्या दृष्टीने पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमणे, तसेच पिंपळे गुरव येथील वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावर कल्पतरू चौकात सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्र.२७ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रेलिंग करणे व मनपा शाळांमधील स्थापत्य विषयक कामेही करण्यात येणार आहेत.

आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी कै. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील क्ष-किरण विभागासाठी बॅटरी खरेदी, जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, तसेच नवीन थेरगाव गावठाण येथे ३४० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी फर्निचर खरेदीस मान्यता देण्यात आली. याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मानधन तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी ४ सक्शन युनिट वाहने व प्रत्येकी २ मजूर उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेत मनपा शाळांमध्ये १३८ डेटा एन्ट्री ऑपरेटर (प्राथमिक १२० व माध्यमिक १८) २४ महिन्यांसाठी नेमण्यास, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, प्रगतीपुस्तके व प्रवेश फॉर्म छपाईस, तसेच संगणकीय केबल नेटवर्क उभारणीस मान्यता देण्यात आली. महापालिकेचा विकास आराखडा मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. तसेच ई-मेल अकाऊंटचे नूतनीकरण व दैनंदिन देखभाल कामास मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्वच्छता व पर्यावरणाच्या दृष्टीने शौचालय साफसफाई व देखभाल करणाऱ्या महिला बचत गटांना ६ महिन्यांऐवजी ११ महिन्यांची मुदतवाढ, त्यांच्या मानधनात वाढ, तसेच शून्य कचरा प्रकल्पांतर्गत मे. आसरा सोशल फाऊंडेशन संस्थेस १७ शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली. श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या वेतन खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी वाहन भाडेतत्वावर घेणे, अग्निशमन विभागातील ११ वाहनांची दुरुस्ती, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील फायर सेफ्टी ऑडिटनुसार कामे, स्मशानभूमींमध्ये चिमणी बसविणे, रस्ते दुभाजकांची देखभाल, गटार व रस्ते साफसफाई, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई, आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे या कामांसाठीही खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय पीएमपीएमएलच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नियमित संचलन तुटीसाठी अनुदान देण्यास तसेच पीजीआय/वायसीएमएच (PCMC) साठी विविध शासकीय व विद्यापीठ शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकूणच, स्थायी समिती सभेत शहरातील सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा बळकटीकरण, आरोग्य व स्वच्छता सुधारणा, तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापक निर्णय घेण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा