बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारवाटेवर चालल्यामुळेच बौद्ध समाजाची प्रगती झाली हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आरक्षण ही एक संधी आहे , प्रगती नाही. आरक्षण हे शस्त्र आहे, शास्त्र नाही. "शस्त्र" हे ती परिस्थिती निभावून घेण्यासाठी वापरात आणलेले हत्यार आहे तर "शास्त्र" हे कसे जगायचे याचा मूलमंत्र आहे. बाबासाहेबांचे विचार हे शास्त्र समजून बौद्ध समाजाने त्यांचे काटेकोरपणे पालन केले. म्हणून समाजामध्ये परिवर्तन दिसून येत आहे. हत्यारं (शस्त्र = आरक्षण) तर ५९ च्या ५९ हातांमध्ये होते ना? मग केवळ बौद्ध समाजानेच जास्त आरक्षणाचा फायदा घेतला असे कसे म्हणता? मराठीत एक म्हण आहे, "नाचता येईना अंगण वाकडे" असे वाकड्यात शिरून सरळ रस्ता होणार आहे काय? तुमच्या हातात आरक्षणाचे हत्यार असताना तुम्हाला त्याचा वापरच करता येत नाही! म्हणजे तुम्ही त्या क्षमतेचे बनतच नाही तर दुसऱ्याच्या प्रगतीकडे अंगुली निर्देश करून दुषणे देण्याला काय अर्थ आहे? अगोदर पात्रता निर्माण करा. "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" या बाबासाहेबांनी सांगितलेल्या मूलमंत्रावर चालायला लागा. याच मूलमंत्रावर जे जे कोणी चालले त्यांची प्रगती झाली. "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" या विचारांची अंमलबजावाणी केल्यामुळेच बौद्ध समाजाची प्रगती झाली आणि होत आहे. केवळ आरक्षणामुळे बौद्ध समाजाची प्रगती झालेली नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेब शिका म्हणाले, तुम्ही शिकत नाही. बाबासाहेब संघटीत व्हा म्हणले तुम्ही संघटित होत नाही. आता तर "अबकड" ची तुमची मागणी म्हणजे हे तर विघटन आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या संघटित व्हा या विचारधारेला फाटा फोडण्याची ही कृती आहे. आणि संघर्ष तर तुम्ही करीत नाही. SC मधील कुणावरही अन्याय झाला तर आंबेडकरवादी बौद्ध समाजच संघर्ष करतो. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बौद्ध समाज तंतोतंत पाळतो म्हणून बौद्ध समाजाची प्रगती होतांना दिसत आहे. केवळ आरक्षणामुळे नाही तर बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांच्या अंमलबजावणीमुळे प्रगती होत असते हेच सत्य. आरक्षण हा केवळ जन्म आहे आणि बाबासाहेबांनी तो (SC मधील ५९ जातींना) सगळ्यांनाच समान दिलाय. अ-ब-क-ड मुळे त्यात असमानता झाली तर मग कमी अधिक होईल, डावे उजवे होईल!
एकंदरीत अवघड होईल असे वाटत आहे. आरक्षण हे जीवन नाही. आंबेडकरवाद हे जीवन आहे, जो आंबेडकरवाद जगतो तो प्रगती बघतो. बाबासाहेबांची लेखणी आणि वाणी ISM झाली आहे. आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी यांचा उदय झाला. बौद्ध समाजातील शंभर टक्के लोकांची सर्वांगीण प्रगती झाली असे अजिबात म्हणता येणार नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी आंबेडकरवादाचे पालन केले त्यांची प्रगती दिसून आली. एखादी लढाई जिंकण्यासाठी शस्त्र हातात दिले आहे परंतु ते शस्त्रधारी व्यक्तीला वापरताच आले नाही तर गळ्यात विजयाचा पुष्पहार अर्पण होण्याऐवजी "हार" पत्करावी लागते. तेव्हा मात्र पराजित व्यक्तिमत्वे हे जिंकलेल्या व्यक्तिमत्त्वांवर पोकळ आरोप करण्याची उठाठेव करतात.
बौद्ध समाजाच्या पदरात पडत असलेला प्रगतीचा वाटा म्हणजे बाबासाहेबांच्या विचारवाटेवर चाललेल्या कष्टाचे फळ आहे. बौद्ध समाजाचा विकास हा केवळ आरक्षणाचे फळ चाखल्याने नाही तर गुलामगिरी दूर फेकल्याने झाला. गावगाड्यातली जी जी कामे गुलामगिरीची प्रतीके होती ती ती कामे निर्भीडपणे नाकारून दिल्यामुळेच बौद्ध समाज मुख्य प्रवाहात स्वीकारून घेतला जातोय. विषमतावादी रूढी परंपरा विकृती लाथाडून सुसंस्कृतीचा स्वीकार केल्यामुळे सर्व क्षेत्रातील कृतीत बौद्ध समाजाची सुंदर आकृती रेखाटलेली दिसत आहे. एकेकाळी वेशीबाहेर असलेल्या बौद्ध समाजाने अंधश्रद्धा दैववाद वेशीच्या बाहेर फेकून दिला म्हणूनच आज वेशीच्या आत बौद्धांना मान पान आणि सन्मान आहे. बौद्ध सरपंच झाला, बौद्ध जिल्हा परिषदेवर गेला, बौद्ध आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, देशाची सुप्रीम पावर सुप्रीम कोर्टाचा सर नायधीश झाला. बौद्ध आज कोट्याधीश झाला. याचे कारण म्हणजे आंबेडकरवादी अमृताचा प्राशन केलेला पेला आहे. बौद्धांनी (तत्कालीन महारांनी) अंगारे धुपारे सोडले आणि प्रगतीच्या उच्च शिखरावर चढले. अज्ञान सोडले विज्ञानाशी जोडले, व्यसनांच्या खाईत बुडालेले बाहेर पडले, हे असे सगळे घडले त्याचे श्रेय बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्या विचार वाटेवर चालणाऱ्या लोकांना जाते.
बौद्ध समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा विचार करताना 'आरक्षण' या एकाच पैलूवर भर देणे संयुक्तिक होणार नाही. प्रगती केवळ आरक्षणापुरती मर्यादित नसून, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आणि समाजाची अंतर्गत वैचारिक क्रांती अधिक महत्त्वाची आहे. आरक्षणामुळे केवळ प्राथमिक संधी उपलब्ध झाली, पण प्रगतीची खरी गती 'शिक्षण' आणि 'प्रज्ञा-करुणा-समता' या तत्त्वांच्या अंगीकारातून आली. बौद्ध समाजाने शिक्षणालाच प्रगतीची गुरुकिल्ली मानले. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी-परंपरांना नाकारून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे समाजाची वैचारिक झेप सुलभ झाली. धम्मक्रांतीनंतर समाजात आलेली आत्मसन्मानाची जाणीव ही विकासाची मुख्य प्रेरक शक्ती ठरली. आज हा समाज केवळ सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून नाही, तर उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि कला अशा विविध क्षेत्रांत स्वकर्तृत्वावर ठसा उमटवत आहे. त्यामुळे समाजाची ही बहुआयामी प्रगती ही एक मोठी सामाजिक क्रांती असून, तिला केवळ आरक्षणाच्या मर्यादित चौकटीत पाहणे अन्यायकारक ठरेल. शिक्षणाच्या खुल्या केलेल्या दारांमधून मार्गक्रमण करीत असलेली पोरी पोरं आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगत विचारांचा अंगीकार करणारे आंबेडकरवादी खऱ्या प्रगतीचे बीज आहे. शहरात स्थलांतर करून बांधकामांवर बिगारी म्हणून काम करणारा आज बिल्डर झालाय, कंपनीत हेल्पर म्हणून काम करणारा कालांतराने आपल्या बुद्धी चातुर्याने स्वतः ची कंपनी निर्माण करून उद्योगपती झालाय, एखाद्याच्या गाडीवर ड्रायव्हर असलेला आज ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक झालाय या इत्यादी ठिकाणी तर बौद्धांनी आरक्षण घेऊन प्रगती केली नाही! शिका संघटित व्हा संघर्ष करा या सूत्राचा अवलंब करून मन मेंदू आणि मनगटात आंबेडकरवादाची झलक दाखवून घडलेला चमत्कार म्हणजे बौद्धांची प्रगती आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकारणात बौद्ध समाजाने आरक्षणाचा फायदा घेतला जो ईतर सर्वांनी सुद्धा समान घेतला. ज्याच्याकडे क्षमता, ज्ञान आणि शैक्षणिक पात्रता होती त्यांना वेळोवेळी संधी मिळाल्या त्या संधीच सोनं अनुसूचित जातींमधील पात्रताधारक सर्वांनीच केलं.
आज बौद्ध IT क्षेत्रात ऐटीत जॉब करतो, इथे कुठेय हो आरक्षण! मग बौद्ध समाजानेच जास्त आरक्षणाचा फायदा घेतला हे म्हणणे व्यर्थ आहे. आज क्रीडा कौशल्य आत्मसात करून देशाचं प्रतिनिधित्व बौद्ध समाजाची मुलं मुली करतांना पाहायला मिळतात, कला संस्कृतिक साहित्य क्षेत्रात नावारूपाला आलेली पाहायला मिळतात. देशाच्या नीती आयोगाच्या (प्लॅनिंग कमिशन) अध्यक्षपदी विराजमान असलेले अध्यक्ष बौद्ध समाजातून जातात कारण पात्रता सिद्ध करतात म्हणून प्रगती आहे ना? इथे कुठे SC मधून आरक्षण घेतले? नाही ना? बौद्ध समाज संविधानवादी आहे, दैववादी नाही. बौद्ध समाज लोकशाही मानतो, कुणाची हुकूमशाही नाही. बौद्ध समाज बाबासाहेबांना मानतो, कुठल्या बुवा बाबाला नाही. बौद्ध समाज इतिहास भूगोल नागरिकशास्त्र वाचतो फक्त नाचत नाही. आज आंबेडकरी समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या गर्दीत फक्त खडा फेकला तर तो ग्रॅज्युएट व्यक्तीलाच लागेल, असे म्हणावे लागेल कारण समाजातील लोकं तेवढी शिकलेली आहेत.
बौद्ध समाज शिकला, ग्रॅज्युएट , पोस्ट ग्रॅज्युएट झाला, मान पानाच्या नोकरी धंद्याला लागला, उद्योगपती झाला, ठेकेदार झाला, काबाड कष्ट करून स्वाभिमानाने जगला आणि जगत आहे. त्या बौद्ध समाजाच्या खंबीरपणे ताठ मानेने उभे राहण्या पाठीमागे जो कणखर कना आणि निर्भीड बाना आहे तो फक्त "आंबेडकरवाद" आहे. आरक्षण ही एक संधी आहे साध्य नाही. बाबासाहेबांच्या विचारांवर चालल्यामुळे बौद्ध समाज प्रगतीची शिखरे पार पारित पुढे जात आहे. आरक्षणही बाबासाहेबांनीच दिले आणि प्रगतीचा आंबेडकरी विचारही बाबासाहेबांनीच दिला. बौद्ध समाजाने या दोन्हीं गोष्टी आत्मसात करून त्याची अंमलबजावणी केली. आता अ-ब-क-ड मागणाऱ्यांनी केवळ आरक्षण घेतलं, प्रगतीचा आंबेडकरी विचार नाही घेतला. त्यामुळे अ-ब-क-ड वाल्यांची प्रगती बौद्ध समाजाच्या उंचीपर्यंत पोहचलेली नाही असे म्हणता येईल. आंबेडकरी विचारवाट हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे आणि याच मार्गावर चालत असल्यामुळे बौद्ध समाजाची प्रगती होत आहे.
__विनय दत्तू सोनवणे (संपादक : सांगावा न्यूज)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा