महाराष्ट्राच्या एका कार्यक्षम, दूरदृष्टीच्या लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तक रूपाने दिलेल्या आदरांजलीचा सोहळा__ मारुती भापकर
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २५ : हार्ट प्रकाशन, पुणे यांच्या तर्फे प्रकाशित अजित पर्व या लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या दैदीप्यमान जीवन कार्याचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या दैदीप्यमान जीवन प्रवासाचा, कार्य संस्कृतीचा, शिस्त प्रिय कार्यक्षम नेतृत्वाचा,निर्णयक्षम विकास दृष्टी आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा वस्तुनिष्ठ व अचूक वेध घेणारे हे पुस्तक महाराष्ट्राच्या पुढील पिढीतील वाचकांना अभ्यासकांना राजकीय व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी ठरेल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
अजित पर्व चे लेखक प्रकाश जाधव यांनी संशोधन, संदर्भ व वास्तववादी मांडणीच्या द्वारे अजितदादांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव, प्रकाशक विनोद शिंदे( हार्ट प्रकाशन पुणे), सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, ऍड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे, किरण खोत यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्य प्रेमी तसेच अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा प्रकाशन सोहळा केवळ एका पुस्तकाचा नव्हता तर महाराष्ट्राच्या एका कार्यक्षम, दूरदृष्टीच्या लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तक रूपाने दिलेल्या आदरांजली चा होता अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यावेळी व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा